जेमतेम सहा दशकांचे आयुष्य असलेल्या उल्हासनगर शहराचा स्थानिक प्रशासकीय कारभार कायम वादग्रस्त राहिला आहे. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे उल्हासनगर महापालिकेचा शासनाने विखंडित केलेला रोटरी क्लब संस्थेचा प्रस्ताव. प्रशासनाचे असे अनेक ठराव वादग्रस्त आहेत. त्या सर्वाची गुणवत्ता तपासली तर बहुतेक ठराव असेच रद्द करावे लागतील, इतकी अनागोंदी उल्हासनगर पालिकेच्या कारभारात आहे. उल्हासनगर पालिका ही आपली जहागिरी असल्याच्या थाटात येथील लोकप्रतिनिधी वागतात. त्याबाबतीत राजकीय मंडळींचे सर्वपक्षीय एकमत असते. कायदे मोडून अनधिकृत बांधकामे करणे हा जणू येथील काही मंडळींचा जन्मसिद्ध हक्कच आहे..
उल्हासनगरचा पूर्व इतिहास हा दहशत, दादागिरी आणि हडपशाहीचा आहे. राजकीय आधार घेऊन वाढलेली शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावरील विषवल्ली शहराच्या विकासात सर्वात मोठी अडथळा आहे. पालिकेचा महसूल, कोटय़वधी रुपयांचा अनुदान रूपाने शासनाकडून मिळणारा महसूल पाहता, उल्हासनगरचा सर्वागीण विकास होणे आवश्यक होते. दहा वर्षांपर्यंत वसाहतीचे हे शहर आटोपशीर होते. नव्वदच्या दशकात या शहरातील रस्ते, टोलेजंग इमारती पाहून काही र्वष सिंगापूरचे नक्कल शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र कालानी यांच्या राजवटीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले.
कलानीची शहरावरील राजकीय पकड ढिली होत गेली, तशी अन्य राजकीय पक्ष आणि मंडळींनी पालिकेतील सत्तेसाठी आपली राजकीय हुकमत वाढविण्यास सुरुवात केली. पालिकेत सत्ता काबीज करायची आणि सर्वानी मिळून शहर विकासासाठी आलेल्या निधीवर डल्ला मारायचा. शहरातील सर्व विकास कामांचे ठेके आपल्या भाईबंदांना मिळतील, अशी व्यवस्था करायची. हेच अनेक वर्षांपासून उल्हासनगर पालिकेत सुरूआहे. त्यामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील प्रदूषित नाला अनेक वर्षांत पालिका बंद करू शकली नाही. उल्हासनगर पश्चिम भागात प्रवेश केल्यानंतर दरुगधीयुक्त रासायनिक सांडपाणी वाहून नेणारा नाला पादचाऱ्यांचे स्वागत करतो. नागरी विकासापेक्षा स्वविकासाला शहरात सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. शहरातील वाहतूक कोंडी हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. कोणतीही शिस्त या शहरात दिसून येत नसल्याने, बेशिस्तीनेच वागायचे असते हे येथील सर्वच स्तरातील रहिवाशांनी अंगी बाणवून घेतले आहे.
उल्हासनगरमध्ये मोठय़ा प्रमाणात लहान, मोठे उद्योग व्यवसाय आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कर उत्पन्नात पालिका मागे नाही. पण, अंमलबजावणी यंत्रणा राजकीय व्यवस्थेने एका चौकटीत बांधून ठेवली असल्यामुळे करदात्यांचा पैसा पालिकेच्या तिजोरीत येण्यापेक्षा तो खासगी तिजोरीकडे कसा वळेल याकडे अंमलबजावणी यंत्रणा अधिक लक्ष देत असते. या शहराचे दुर्भाग्य असे, एकदाही या शहराला खमक्या आयुक्त मिळाला नाही. ज्यांनी कायद्याचा बडगा दाखविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तोंडाला काळे फासणे, त्यांच्या अंगावर शाई फेकणे असे उद्योग केले गेले. शहराचे भले करण्यासाठी धडपडणाऱ्यांना तुम्ही जर अशी शिक्षा देत असाल तर तुमच्या कर्माचे भोग तुम्हीच भोगा, असा अंमलबजावणी करणारा आयुक्त म्हणतो आणि आहे त्या चौकटीत काम करून निघून जातो. पालिकेत ठरावीक ठेकेदार, दलाल आणि ठरावीक अधिकारी यांची अभेद्य साखळी तयार झाली आहे. ही साखळी ऐऱ्यागैऱ्याला तोडणे शक्य नाही. प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी तीन वर्षांचे पाहुणे असल्याने, ते आपल्या कारकिर्दीत काही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. पण स्थानिक वर्षांनुर्वष ठाण मांडलेले अधिकारी अशा अधिकाऱ्यांच्या कामात कोलदांडे घालतात. त्यामुळे विकास कामे पुढे जात नाहीत.
शहरातील वाहतूक कोंडीला एक पर्याय उभा राहावा म्हणून शहराबाहेरून जाणारा एक रस्ता काही र्वष शहरवासीयांनी रोखून धरला होता. अनेक वर्षांपासूनचे व्यावसायिक या रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवसाय करतात. निवास करतात, त्यामुळे त्यांना रस्त्यावर आणणे योग्य नाही, अशी कारणे देऊन एक महत्त्वपूर्ण रस्ता अडवून धरण्यात आला होता. या रस्त्याच्या दुतर्फा आठशे ते नऊशे इमारती, गाळे होते. यापूर्वीच्या सर्व आयुक्तांनी शहरवासीयांच्या इशारे आणि राजकीय हुजरेगिरीने कामे केली. आपली आयुक्त पदाची खुर्ची सांभाळण्यात वेळ घालविला. त्यामुळे गेल्या वीस ते तीस वर्षांत उल्हासनगर कधी सुंदर नगर होऊ शकले नाही.
मात्र गेल्या वर्षीपासून विद्यमान आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील या बेकायदा कृत्यांना आळा घालण्याचे काम सुरू केले आहे. करदात्या लोकांचा पैसा हा विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, हे हिरे यांचे ठाम मत आहे. त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामे, रखडून ठेवलेला रस्ता मोकळा करून देणे, बेकायदा बांधकामे हटविणे आदी कार्यवाही सुरू केली आहे. आयुक्त हिरे यांच्या खमक्या कारभाराचा आणखी उत्तम नमुना म्हणजे त्यांनी रोटरी क्लबचा साधुवासवानी उद्यान नाममात्र दराने रोटरी क्लब संस्थेला नाममात्र देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि तो रद्द करून घेतला. उल्हासनगरमधील ठेकेशाहीचे अवलोकन केले तर एका विशिष्ट ठेकेदाराची मक्तेदारी असल्याचे आढळून येते. तीच तीच कामे एकाच ठेकेदाराच्या गळ्यात मारून ठेवली आहेत. एकाच ठेकेदाराची शहरात मक्तेदारी निर्माण झाली, की मग तो कोणाला जुमानासा होतो. उल्हासनगरमध्ये नेमके तेच घडते आहे.
शहरातील गोलमैदानजवळ साधुवासवाणी उद्यानाचा साडेपाच हजार चौरस फुटांचा भाग सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शहरातील रोटरी संस्थेला दहा वर्ष करारबोलीने दिला होता. या कालावधीत रोटरी संस्थेकडून उद्यान भाडय़ाने देताना खूप अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो. ठरावीक लोक या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी पुढे असतात, अशा तक्रारी पालिकेत येत होत्या. करारबोली आणि राजकीय दडपणामुळे प्रशासन काहीही करू शकत नव्हते. कराराचे वर्ष संपले तरी उद्यान भाडय़ाने देण्याचे काम सुरू असल्याने, या संस्थेच्या उद्यान चालविण्याच्या कामाचा ठेका नूतनीकरण केला पाहिजे म्हणून प्रशासनाने या संस्थेला ठरावीक जागा निश्चित करून मासिक ९२ हजार रुपये भाडेपट्टय़ाने हे उद्यान पुन्हा चालविण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. या उपक्रमातून पालिकेला वर्षांला अकरा लाखाचा महसूल मिळणार होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या रकमेत आणखी वाढ सुचवून पालिकेचा महसूल कसा वाढेल या दृष्टीने विचार करणे आवश्यक होते. परंतु, रोटरी संस्था मध्यमवर्गीय मंडळींची उठबस असलेली एक संस्था. या संस्थेतील पदाधिकारी, सदस्यांचे सर्वच सदस्यांनी प्रेम, जिव्हाळ्याचे संबंध असल्याने, निवडणूक काळात या सदस्यांचे चांगले पाठबळ मिळते, हा विचार करून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी आणि त्यात टोळीबाज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रोटरी संस्थेला नव्याने उद्यान चालविण्यास देताना ते फक्त नाममात्र एक रुपये भाडे आकारून देण्यात यावे, असा प्रस्ताव तयार केला. तो सर्वसाधारण सभेत मंजूर केला. पण या प्रस्तावामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे, याचा थोडाही विचार नगरसेवकांनी केला नाही. प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर केला तर पालिकेचे किती आर्थिक नुकसान होईल, हे नगरसेवकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण पालिकेच्या तिजोरीपेक्षा मतपेटीही तितकीच महत्त्वाची असते, हे प्रशासनाला दाखवून एक रुपया भाडेच रोटरी संस्थेसाठी योग्य आहे, हे दाखवून दिले. अखेर पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाने विखंडित (रद्द) करण्यासाठी पाठविला आणि अर्थातच शासनाने हा ठराव रद्द केला. उल्हासनगरमधील बजबजपुरीचे हे एक छोटे उदाहरण आहे.
‘उल्हासी’ राजकारणाचे पितळ उघड
जेमतेम सहा दशकांचे आयुष्य असलेल्या उल्हासनगर शहराचा स्थानिक प्रशासकीय कारभार कायम वादग्रस्त राहिला आहे.
Written by भगवान मंडलिक
First published on: 04-05-2016 at 01:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar city local administrative management