उल्हासनगरः पालिकेचे कामकाज गतीमान व्हावे आणि निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ई कार्यालय प्रणालीची अंमलबजावणी करू पाहणाऱ्या उल्हासनगर महापालिका आयुक्तांना त्यांचे विभाग प्रमुख प्रतिसाद देत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सर्व विभागांना सक्त ताकीद दिली असून प्रत्येक विभागाने कामकाज ई कार्यालयामध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागांवर शिस्तभंगाच्या कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी काही दिवसांपू्र्वी राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ई कार्यालय प्रणाली लागू करणे अनिवार्य केले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजातही संगणकाचा अधिकाधिक वापर करुन प्रशासकीय कामकाज गतीमान व्हावे यासाठी ई कार्यालय प्रणाली लागू करण्यात आली. कामकाजात सुसूत्रता येण्यासोबतच दस्तऐवज सुरक्षित ठेवणे, माहिती तात्काळ आणि जलद गतीने देणे. तसेच निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये या ई-कार्यालय प्रणालीची अंमलबजावणी शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु झाली.
सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबतची माहिती व्हावी म्हणून ई- कार्यालय संगणक प्रणालीचे प्रशिक्षण सर्व विभागांना देण्यात आले होते. त्यानंतर विभागांनी आपापल्या विभागाच्या संचिका याच पद्धतीने पाठवणे अपेक्षित होते. मात्र यामध्ये २१ विभागांनीच आपल्या संचिका ई-कार्यालय प्रणालीव्दारे पाठविल्या. मात्र उर्वरित विभागांनी ई-कार्यालय प्रणालीचा अवलंब केला नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत खेद नोंदवला आहे. मात्र येत्या १५ मार्च पर्यंत संपूर्ण कामकाज ई कार्यालयामध्ये परावर्तीत करायची असल्याची ताकीद आयुक्तांनी दिली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाला काही लक्ष्य देण्यात आले आहेत. त्यानुसार विभागांनी विभागांनी यापुढे त्यांच्या विभागातील सर्व कामकाज ई-कार्यालयत प्रणालीव्दारे करुन कामकाजाचा साप्ताहिक, पंधरवडा आणि मासिक अहवाल भरुन माहिती तंत्रज्ञान विभागाकडे न चुकता सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात विलंब करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.