उल्हासनगर : उल्हासनगर शहरात गेल्या काही आठवड्यात रस्ते खोदकाम आणि खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटदाराने खोदकाम योग्य पद्धतीने न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे. सोबतच शहरातील महत्वाच्या सात रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वीच संपवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

उल्हासनगर शहरात खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एक स्त्रीरोग तज्ज्ञ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा आणि भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील रस्ते आणि खोदलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच दोनच दिवसांपूर्वी अशाच एका खड्ड्यात एक दुचाकीस्वार जाऊन पडून अडकला होता. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील विविध रस्ते आणि खोदकामांचा आढावा धेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अमोल जाधव, प्रभारी शहर अभियंता हनुमंत खरात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे कंत्राटदार आणि सल्लागार उपस्थित होते. यावेळी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या साक रस्त्यांची कामे जलदगतीने होण्याकरता कामाच्या भौतिक प्रगतीची शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी दररोज पाहणी करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. ही सर्व रस्त्यांची कामे मेअखेरीस पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.

शहरात पोलिसांकडून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरु असून यासाठी आवश्यक खोदकामापूर्वी परवानगी घेण्याचे, कामानंतर रस्ते पुर्ववत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच ठेकेदार नियोजनबध्द पध्दतीने काम करत नसल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, असेही आयुक्तांनी सांगितले. सोबतच या बैठकीचा अनुपालन अहवाल पुढच्या आठवड्यात सादर करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे रस्ते खोदकामात होणारा बेजबाबदारपणा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

सध्या इथे कामे सुरू

उल्हासनगर कॅम्प ०४ येथे नेताजी चौक ते कैलास कॉलनी रस्ता कुर्ला कॅम्प मार्गे, वॉक्को कंपाऊंड ते विनस चौक वी. टी. सी. ग्राउंड मार्गे आणि सोनार चौक ते कोयांडे रस्ता शारदा कॅस्टल मार्गे, उल्हासनगर कॅम्प ०५ येथील न्यू इंग्लिश हाई स्कूल ते लालचक्की, उल्हासनगर कॅम्प ०१ येथील ए ब्लॉक ते साईबाबा मंदिर, डॉल्फिन क्लब आणि सेंच्युरी ग्राउंड मार्गे, उल्हासनगर – ०३ येथील हिरा घाट मंदिर ते डर्बी हॉटेल, समर्पण अपार्टमेंट मार्गे आणि शामा प्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन मार्गे या ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीच्या समस्या सुरू असल्याने नागरिकांत संताप आहे.

ते विद्युत खांब हलवा

एमएमआरडीएकडून कामे सुरु असलेल्या रस्त्यांवर येत असलेले विद्युत खांब आणि रोहित्र हलवण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर जलद कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. अनेकदा रस्ते तयार झाल्यानंतरही ते खांब तसेच राहिल्याने अनेक अपघात झाल्याचे दिसून आले आहे.

Story img Loader