उल्हासनगर: गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली शहाड रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूलाखालील अवैध वाहनतळ हटवण्यात आले आहे. उल्हासनगर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अवैध दुचाकी उभ्या करत त्यांच्याकडून अवैध वसुली सुद्धा केली जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहाड हे कल्याणआधीचे सर्वाधिक वर्दळीच्या असे रेल्वे स्थानक आहे. कल्याण ग्रामीण भागातून अनेक नोकरदार स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी दुचाकी वापरतात. या सर्व दुचाकी स्थानक परिसरात उभ्या केल्या जातात. यातील स्थानकाशेजारी असलेले वाहनतळ कायदेशीर आहे. मात्र स्थानकाच्या शेजारी रेल्वे उड्डाणपूलाखाली गेल्या २० वर्षांपासून अवैध वाहनतळ सुरू होते. दुचाकी उभ्या करून येथे अवैध रित्या पैसे वसूल केले जात होते. याबाबत अनेक तक्रारी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. विशेष म्हणजे पालिकेने नेमलेल्या वाहनतळ संस्थेला आणि पर्यायाने पालिकेला याचे आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. या अवैध वाहनतळाविरोधात यापूर्वीही कारवाईचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अनेक वर्षांपासून यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

अधिकारी चालढकल करत असल्याने हे वाहनतळ राजरोसपणे सुरू होते. अखेर उल्हासनगर महापालिकेच्या नव्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील अशा अवैध वाहनतळावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त अलका पवार यांनी आपल्या पथकासह आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहाड रेल्वे स्थानकाजवळील या अवैध वाहनतळावर कारवाई करत संपूर्ण वाहनतळ हटवले. महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर शहरातील अन्य अवैध वाहनतळांवरही कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.