डोंबिवली : कल्याण पूर्वेतील मलंग रस्ता भागातील आडिवली ढोकळी भागात काका ढाब्याजवळील दोन गृहसंकुलातून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन बांग्लादेशी महिला आणि या महिलांना आश्रय देणाऱ्या दोन नागरिकांना गुरुवारी अटक केली. पारपत्र, व्हिसा जवळ नसताना त्या भारतात बेकायदा राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या नागरिकांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरजाना शिरागुल शेख (३६, रा. चांदुरे, जिल्हा सातखिरा, बांग्लादेश), बिथी उर्फ प्रिया नूरइस्लाम अख्तर (२४, रा. गुलीस्तान, जि. ढाका, बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी महिलांची नावे आहेत. या महिला कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी गावातील काका ढाब्या जवळील राजाराम पाटील नगर मधील साईयोग रेसिडेन्सी, गणेशनगर मधील स्वस्तिक विहार इमारतीत राहत होत्या. साईयोग रेसिडेन्सीमध्ये फरजाना शेख यांना ताहीर मुनीर अहमद खान (३५), प्रिया अख्तर यांना गणेश चंद्रा दास (३७) यांनी स्वस्तिक विहार इमारतीत आश्रय दिला होता.

कल्याण पूर्वेतील काका ढाबा परिसरात दोन बांग्लादेशी महिला भारतात वास्तव्याचे पारपत्र, व्हिसा यांच्याविना राहत असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने गुरुवारी या बांग्लादेशी महिला राहत असलेल्या इमारतीत छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतात निवासाचे पारपत्र, व्हिसाची मागणी केली. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. या महिलांना ताहीर खान, गणेश दास आश्रय देत असल्याचे पोलिसांना आढळले.

भारतात विना परवाना राहत असल्याने उल्हासनगर गुन्हे शाखेचे हवालदार प्रसाद तोंडलीकर यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात चारही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.

गेल्या सहा महिन्यात कल्याण, डोंबिवली परिसरातून पोलिसांनी वीसहून अधिक बांग्लादेशी घुसखोर नागरिकांना अटक केली आहे. बहुतांशी घुसखोर बांग्लादेशी पुरूष मजुरी, चालक म्हणून काम करत असल्याचे आणि महिला हाॅटेल, बारमध्ये सेविका म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.