उल्हासनगर: सुमारे ९९५ कोटी मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेने लागू केलेली अंतिम अभय योजना करदात्यांच्या निरुत्साहामुळे निष्प्रभ ठरल्याची चर्चा आहे. आठवड्याभराच्या कालावधीत अवघे १२ कोटी २० लाख ८० हजार ६३१ रुपये वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. अवघ्या ७ हजार ८६६ मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमीच प्रतिसाद अभय योजनेला मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे अंतिम अभय योजना ही निष्फळ ठरते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आपल्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पपेक्षा अधिक मालमत्ता करायची थकबाकी असलेली उल्हासनगर महापालिका वर्षानुवर्षे कर वसुलीत मागे पडते आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेची एकूण मालमत्ता कराची थकबाकी ९९५ कोटींवर पोहोचली आहे. कर वसुलीसाठी गेल्या दहा वर्षात उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अनेकदा अभय योजना लागू केली. मात्र तरीही थकबाकी नवनवीन विक्रम रचते आहे. सध्या उल्हासनगर महापालिकेला अभय योजना लागू केली आहे. २४ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या अभय योजनेत तीन टप्पे समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात ६ मार्चपर्यंत थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम एकरकमीअदा केल्यास शंभर टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. पहिला टप्पा संपण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र पहिल्या आठवड्याभरात अभय योजनेत कोणतीही विशेष वसुली करता आलेली नाही. उल्हासनगर महापालिका कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ७ हजार ८६६ मालमत्ता धारकांनी या अभय योजनेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत अवघे १२ कोटी २० लाख ८० हजार ६३१ रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे सरासरी दीड ते पावणेदोन कोटी रुपये वसूल झाल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर महापालिकेचे एकूण थकबाकी पाहता आणि दररोज अभय योजनेत होणारी वसलेली पाहता अभय योजना पहिल्या आठवड्यात निष्प्रभ ठरल्याची चर्चा होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात ७ ते १२ मार्चपर्यंत थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम आणि २५ टक्के शास्त्रीची रक्कम एक रकमी भरल्यास विलंब शास्तीत ७५ टक्के माफ केली जाणार आहे. तर तिसरा टप्प्यात १३ मार्च ते १८ मार्च दरम्यान थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम आणि ५० टक्के शास्ती एकरकमी भरल्यास ५० टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर शेवटच्या दोन टप्प्यात किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पालिकेचा कर भरणा वाढावा आणि नागरिकांना थकबाकी भरता यावी यासाठी त्यांच्याच मागणीनुसार अभय योजना लागू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्याचे आणखी तीन दिवस बाकी आहेत. नागरिक पुढे प्रतिसाद देतील अशी आशा आहे. कर वसुलीसाठी आक्रमक निर्णय घेतले जातील. – मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका.

Story img Loader