ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५० लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या उल्हास नदीतून होतो त्या नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न झाले. मात्र नागरी आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे नदीचे प्रदुषण सुरूच असून त्यामुळे नदीत पुन्हा जलपर्णीने डोके वर काढले आहे. सध्याच्या घडीला कल्याण तालुक्यातून वाहणाऱ्या नदीच्या पात्रावर जलपर्णीचा मोठा थर पसरला असून तीच्या वाढीचा वेग मोठा आहे. त्यामुळे आता नदीकिनारी असलेल्या पाणी उचल केंद्रांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत रंगला श्रेयवाद, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दोघांचा दावा
रायगड जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांमधून वाहणारी उल्हास नदी बदलापुरजवळ ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. या दरम्यान असंख्य गावे आणि शहरांचे सांडपाणी उल्हास नदीत येऊन मिसळते. पुढे बदलापूर शहरातूनही नागरी आणि औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळते. पुढे शहरीकरणाच्या वाटेवर असलेल्या ग्रामपंचायती आणि उल्हासनगर शहराजवळ आणखी काही नाले सांडपाण्याची उल्हास नदीत भर घालतात. त्यामुळे उल्हास नदी प्रदुषीत झाली आहे. प्रदुषणामुळे उल्हास नदीवर जलपर्णी तयार होते. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या जलपर्णीवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. दोन वर्षांपूर्वी सगुणा रूरल फाऊंडेशनच्या माध्यमातून या जलपर्णीला हटवण्यासाठी नवा प्रयोग राबवला. त्याचा फायदा सर्वांनाच झाला. मात्र वर्षभरानंतरही नदी प्रदुषण कायम राहिल्याने पुन्हा जलपर्णीने डोके वर काढले आहे. काही आठवड्यांपूर्वी नदीच्या एखाद्या किनाऱ्यावर दिसणारी जलपर्णी संपूर्ण नदीच्या पाण्यावर दिसू लागली आहे. गेल्या काही दिवसात जलपर्णीने नदीचा मोठा भाग व्यापल्याचे दिसून आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शशीकांत दायमा यांनी दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी नदीवर बंधारे आहेत त्या त्या ठिकाणी ही जलपर्णी जमा झाल्याचे दायमा यांनी सांगितले आहे. तर कल्याण तालुका आणि उल्हासनगराजवळून वाहणाऱ्या या नदीवर जलपर्णीचा हिरवा थर पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे बदलापुरात बॅरेज बंधारा, पुढे कल्याण तालुक्यात आपटी बंधारा आणि शहाडजवळ ठाणे जिल्ह्यातील विविध पालिकांचे पाणी उचल केंद्र आहेत. या केंद्राच्या आसपासही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.