उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे विकास कामांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर पालिका प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून १८ मार्च पर्यंत तीन टप्प्यात अभय योजना लागू केली आहे. ही अभय योजना अंतिम असल्याचे सांगितले जाते आहे. पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकीसह चालू कराची रक्कम एकरकमी भरल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. त्यानंतर विलंबशास्तीत ७५ टक्के तर शेवटच्या टप्प्यात ५० टक्के माफी दिली जाणार आहे.
उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात भीषण झाली आहे. मालमत्ता कराची वसुली होत नसल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक वर्षे पालिकेची थकबाकी आणि पालिकेचा अर्थसंकल्प यात थकबाकी वरचढ दिसत होती. लोकप्रतिनिधींनी अनेकांना दिलेले संरक्षण, थकबाकीदारांवर होत नसलेली ठोस कारवाई आणि रखडलेल्या मालमत्ता प्रकरणांचा निपटारा होत नसल्याने थकबाकी वाढतीच आहे. त्यावर अनेकदा लोकप्रतिनिधींकडून अभय योजनेचा उतारा सूचवला जातो. त्यामुळे गेल्या दशकभरात दहावेळा अभय योजना लागू करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. २०२१ पर्यंत पालिका प्रशासनाने सहा वेळा अभय योजना लागू केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये सातव्यांदा
अभय योजना लागू करण्यात आली. तर आयुक्त अजीज शेख यांनी २०२३ मध्ये दोनदा अभय योजना लागू केली होती. तर २०२४ मध्येही एकदा अभय योजना लागू करण्यात आली होती. तर आता नव्याने आयुक्तपदी विराजमान झालेल्या मनिषा आव्हाळे यांनीही अभय योजना लागू केली आहे. यंदा तीन टप्प्यांमध्ये ही अभय योजना राबवली जाणार आहे. २४ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान नागरिकांना या अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. उल्हासनगर शहरात १ लाख ८३ हजार करपात्र मालमत्ता आहेत. मालमत्ता कर थकबाकीदारांना तीन टप्प्यात वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. पालिका प्रशासनाने ही अंतिम अभय योजना असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या योजनेत किती करभरणा होतो आणि अभय योजनेला थकबाकीदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशी आहे योजना
टप्पा पहिला – दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ ते दिनांक ०६ मार्च, २०२५ -थकबाकीसह चालु कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा केल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.
टप्पा दुसरा – दिनांक ०७ ते १२ मार्च, २०२५ दरम्यान थकबाकीसह चालु कराची संपुर्ण रक्कम आणि २५ टक्के शास्तीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास ७५ टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.
टप्पा तिसरा – दिनांक १३ ते १८ मार्च, २०२५ दरम्यान थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम आणि ५० टक्के शास्तीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास ५० टक्के विलंब शास्ती माफ केली जाईल.