उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या पाच महिन्यात बदली झाली आहे. ढाकणे यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उप सचिवपदी करण्यात आली आहे. अवघ्या साडे चार महिन्याच्या कार्यकाळासाठी ढाकणे उल्हासनगरात होते. त्यांच्यानंतर आता अंबरनाथचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी ऑगस्ट महिन्यात विकास ढाकणे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यापूर्वी अजीज शेख कार्यरत होते. ढाकणे यांची साडे चार महिन्यातच बदली झाली. ढाकणे यांची आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या कार्यालयात उप सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ढाकणे यांची बढती झाल्याची चर्चा आहे. ढाकणे अगदी कमी काळासाठी उल्हासनगरच्या आयुक्तपदी होते. त्यांच्या नंतर आता कुणाची या पदावर वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची आशा आहे. त्यामुळे या पदावर कुणाच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची नेमणूक होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शेजारच्या अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. डॉ. रसाळ यांची अंबरनाथ नगरपालिकेतील मुख्याधिकारी पदाची कारकिर्द कौतुकास्पद मानली जाते. त्यांच्या काळात अंबरनाथ शहरात अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे त्यांची या पदावर वर्णी लागण्याची अधिक शक्यता असल्याचे प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. डॉ. रसाळ यांनी यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.