उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेने सुमारे ९५१ कोटींच्या वसुलीसाठी लागू केलेल्या अभय योजनेत शहरातील अवघ्या २५ हजार थकबाकीधारकांनी सहभाग नोंंदवला. त्यामुळे अवघ्या ५१ कोटींची वसूली करता आली. त्यानंतरही पालिकेच्या एकूण थकबाकीचा आकडा ८२४ कोटींवर आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने शहरातील मोठ्या १०० थकबाकीदारांची यादीच जाहीर केली आहे. आता पालिका थकबाकीदारांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उल्हासनगर महापालिकेने आपल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी अनेक पाऊले उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यात मालमत्ता करवसुली हा सर्वात मोठा विषय असला तरी मालमत्तांचे मुल्यांकनासह अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. भविष्यात दिर्घकाळ परिणाम करणारे निर्णय महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी घेण्याचे ठरवले असले तरी पालिकेची जुनी थकबाकी वसूलीचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात एकुण १ लाख ३६ हजार ५४३ रहिवासी मालमत्ताधारक आहेत. तर ४७ हजार ००७ वाणिज्य मालमत्ता आहेत. शहरात एकुण १ लाख ८३ हजार ५५० मालमत्तांचा समावेश आहे. यातील १ लाख २९ हजार ९२४ मालमत्ताधारक हे थकबाकीदार होते. त्यांच्याकडे सुमारे ९५१ कोटींची थकबाकी होती. त्यातील निव्वळ थकबाकी ही ८३३ कोटी ३० लाखांची तर चालू मागणी ११७ कोटी ८० लाखांची होती. पालिकेने मोठा गाजावाजा करत अखेरची अभय योजना २४ फेब्रुवारीपासून जाहीर केली. मात्र जवळपास महिनाभराच्या या अभय योजनेत अवघ्या २५ हजार ५१० मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे एकूण ५१ कोटींची वसूली या योजनेत झाली. तर एकूण १२६ कोटी १० लाखांची वसुली २२ मार्चपर्यंत झाली. मात्र त्यानंतरही उलहासमगर महापालिकेच्या थकबाकीची रक्कम तब्बल ८२४ कोटी ९० लाख इतकी आहे. त्यामुळे पालिकेच्या अभय योजनेचा फज्जा उडाल्याची चर्चा आहे.
पालिकेने आतापर्यंतची विक्रमी वसुली केल्याचा दावा केला असला तरी या अभय योजनेत अवघ्या १९ टक्के थकबाकीदारांनी सहभाग घेतला. तर अवघे ५ टक्के थकबाकी वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मंगळवारी उल्हासनगर महापालिकेने शहरातील १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. आता यापुढे या थकबाकीदारांवर पालिका काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.