या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर पश्चिमेतून सर्वाधिक जागा; मराठीबहुल भागात मात्र सेनेचे वर्चस्व

उल्हासनगर शहराच्या महापालिका निवडणुकांमध्ये सिंधी विरुद्ध मराठी मतांच्या ध्रुवीकरणानंतर सिंधी मतांच्या जोरावरच भाजपने शहरात मुसंडी मारल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर शहराच्या पश्चिम भागात असलेल्या सिंधीबहुल भागांतच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत, तर मराठीबहुल भागांत शिवसेनेचाच वरचष्मा दिसून आला आहे.

उल्हासनगर शहरात सत्तेसाठी सिंधीबहुल भागांत भाजपने टीम ओमी कलानी आणि प्रमुख सिंधी नेत्यांना सोबत घेत सिंधी महापौरासाठी तयारी सुरू केली होती. त्यानंतर भाजपवर काही प्रमाणात टीकाही झाली होती. मात्र महापौरपद महिलांच्या खुल्या गटासाठी राखीव झाल्याने भाजप आणि सिंधी चेहऱ्यासाठी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. सिंधीबहुल असूनही अनेक वर्षे मराठी लोकप्रतिनिधींनी महापौरपद मिळवल्याने सिंधी समाजात काही प्रमाणात अस्वस्थता होती. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच गुप्तपणे सिंधी महापौरपदासाठी मतदान असा प्रचार सुरू होता. त्याचा परिणाम होत उल्हासनगर पश्चिमेतून सर्वाधिक सिंधी नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २, ५, ६, ८, ९, ११ अशा प्रभागांतून १८ सिंधी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक २, ५, ६ या प्रभागांतून चारही सिंधी नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग ८, ९ आणि ११ मधून प्रत्येकी दोन सिंधी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सिंधी मतदारांना उल्हासनगर पश्चिम भागात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान,  भाजपच्या यशात वाटा असलेल्या टीम ओमी कलानींच्या तब्बल १७ शिलेदारांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यात यश आले आहे. त्यातही सिंधी नगरसेवकांचा अधिक समावेश आहे. त्यापाठोपाठ उल्हासनगर पश्चिमेत १७ मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. यात शिवसेनेच्या नगरसेवकांचा अधिक भरणा आहे. त्यामुळे  सिंधी मतांच्या आणि उमेदवारांच्या जोरावर भाजपने पश्चिमेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar municipal corporation elections 2017 sindhi community in favor of bjp in ulhasnagar
Show comments