उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत सेवेत असलेले काही कर्मचारी त्यांच्या कर्तव्यावर न जाता त्यांच्या जागी अन्य कर्मचारी कामासाठी जुंपत असून मूळ कर्मचारी फक्त हजेरीपुरते उपस्थित राहत असल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे. नुकतेच या प्रकरणी तीन जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिकेतील उपस्थिती नोंदीसाठी बसवण्यात आलेल्या यंत्रणेचा वेतन अदा करण्यासाठी वापर केला जात नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची संख्या किती आणि किती जणांना यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…थायलंडच्या तीन तरुणींची सुटका, वेश्या व्यवसायप्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई

उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त सुभाष जाधव यांनी नुकतीच स्वच्छता कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी काही कर्मचारी जागेवर उपस्थित नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम या पदावरील कर्मचाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिकेतील काही कर्मचारी कामावर उपस्थित न राहता त्यांच्या जागी इतर व्यक्तींनाच कामावर पाठवत असल्याचा संशय पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

यापूर्वीही यासंबंधी अनेक आरोप झाले होते. पालिकेत काही कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळी हजेरी लावून त्यानंतर खासगी कामासाठी बाहेर असतात. अशा वेळी कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हे कर्मचारी रोजंदारीवर काही खासगी कामगार त्याठिकाणी पाठवतात. काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कामगार संघटनांमध्ये सक्रिय असल्याने दबावतंत्र वापरून अशा प्रकरणांवर पांघरूण घातले जात आहे.

हेही वाचा…रसायनांच्या पिंपातील पाणी पिण्याची वेळ!

सदोष यंत्रणा ?

पालिकेतील बायोमेट्रिक हजेरी नोंद यंत्रणेचा वापर करून वेतन अदा केले जात नाही. वेतनासाठी अजूनही कालबाह्य हजेरीपटाचा आधार घेतला जात असल्याची माहिती पालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. सोबतच पालिकेचे स्वत:चे ‘अॅप ड्युटी’ नावाच्या यंत्रणेत कर्मचाऱ्याचा चेहरा ‘स्कॅन’ करणे अपेक्षित आहे. मात्र त्यात कर्मचाऱ्याचा फोटो ‘स्कॅन’ केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत काही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पाहणी केली. जे कर्मचारी गैरहजर होते त्यांच्यासह मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.-जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महापालिका

हेही वाचा…पदवीधर निवडणुकीत मतदानानंतर मतपत्रिकेसह सेल्फी; भाजप महिला शहर अध्यक्षांचा प्रताप, छायाचित्र व्हायरल

पुन्हा नोटीस काढण्याची वेळ

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. दयानिधी यांनी त्यांच्या काळात बायोमेट्रिक यंत्रणेवरूनच वेतन अदा करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र काही दिवसांपूर्वी आयुक्त अजीज शेख यांनी पुन्हा असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आधीचा परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा…ठाण्यातील तरुणाईला गांजा, चरस आणि एमडीचा विळखा; मागील दीड वर्षांत चार हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल

बनावट कर्मचाऱ्यांचा पूर्वेतिहास यापूर्वीही उल्हासनगर महापालिकेत नगररचना विभागात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयात काम पाहण्यासाठी काही खासगी व्यक्ती नेमल्याचे समोर आले होते. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. तर संघटनांच्या दबावातून ज्या ठिकाणी दिवसभर नियमित हजेरीची गरज आहे अशा विभागातून हजेरीची गरज नसलेल्या विभागात बदली केली जात असल्याचे प्रकारही समोर आले होते.