उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेने २२ मार्चपर्यंत १२६ कोटी १० लाख रूपये इतक्या मालमत्ता कराची रक्कम वसूल केली आहे. गेल्या काही वर्षातली ही विक्रमी वसूली असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पालिका प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून शहरात अभय योजना लागू केली होती. शनिवारी योजनेचा कालावधी संपल्यानंतर एकूण ५१ कोटी ५६ लाख रूपयांची वसूली अभय योजनेत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. २५ हजार मालमत्तधारकांनी या योजनेत सहभागी घेतला.
आपल्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या रकमेपेक्षा अधिक मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाने वेळोवेळी अभय योजना लागू केल्या. त्यानंतरही अभय योजनेत थकबाकीदारांकडून विशेष वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले नाही. मात्र दरवर्षी अभय योजना मात्र जाहीर होत राहिल्या. यंदाच्या वर्षातही लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार अभय योजना लागू करण्यात आली होती. यंदाच्या अभय योजनेत मालमत्ताधारकांना सहभागी होण्यासाठी केलेल्या निवेदनात पालिका प्रशासनाने ही शेवटची अभय योजना असल्याचे घोषीत केले.
यंदाच्या आर्थिक वर्षात उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता कराची चालू मागणी ११७ कोटी ८० लाख इतकी होती. त्याचवेळी मालमत्ता कराची थकबाकी तब्बल ९५१ कोटी १० लाख ७९ हजार ४५८ रूपयांवर पोहोचली होती. अभय योजनेची सुरूवात १२ फेब्रुवारीपासून झाली. या योजनेत तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात विलंब शास्ती पूर्णपणे माफ करण्यात आली होती. तर ७ मार्चपासून सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात विलंब शास्ती ७५ टक्के माफ करण्यात आली. त्याचवेळी शेवटच्या टप्प्यात ५० टक्के विलंब शास्ती माफ केली गेली. तिसऱ्या टप्प्याला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार २२ मार्च रोजी अभय योजनेचा कालावधी संपला. या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत उल्हासनगर शहरातील २५ हजार ५१० मालमत्ताधारकांनी योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे या काळात पालिकेच्या तिजोरीत ५१ कोटी ५६ लाख रूपये वसूल करण्यात यश आले. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत एकूण १२६ कोटी १० लाख रूपयांची भर पडली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी रक्कम कररूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाली असल्याचा दावा उल्हासनगर महापालिका प्रशासनाने केला आहे.