उल्हासनगर : शहरातील सुमारे ९५० कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली आहे. मात्र नागरिकांना अभय योजनेत सहभागी होण्यासाठी पालिका प्रशासनाने आधी आपल्या कर्मचाऱ्यांना आपले सर्व मालमत्ता थकीत कर भरण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांची थकबाकी आहे त्यांनी ती वेळेत भरून तसे शून्य देयक पावती सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
उल्हासनगर महापालिका प्रशासनाने नुकतीच अंतिम अभय योजना लागू केली आहे. तीन टप्प्यात अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या या योजनेत मालमत्ताधारकांना थकबाकीवरील शास्ती माफ केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला जातो आहे. गेल्या तीन दिवसात सरासरी दोन कोटी रूपयांची वसूली या माध्यमातून होते आहे. उल्हासनगर महापालिकेतील एकूण मालमत्ता धारकांची संख्या १ लाख ८३ हजार असून त्यातील थकबाकीदारांची संख्या १ लाख २९ हजार इतके आहेत. विशेष म्हणजे पालिकेचे अनेक कर्मचारी महापालिका क्षेत्रातच राहतात. महापालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ७० ते ७५ टक्के अधिकारी आणि कर्मचारी वर्ग स्थानिक आहे. यात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग १, २, ३ आणि ४ श्रेणीतील आहेत.
यात डॉक्टर्स, अधिक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, शिक्षक, मनपा नर्स, मुकादम, माळी, मजुर, सफाई कामगार, तारतंत्री, विजतंत्री, शिपाई, विद्युत मदतनीस, सुरक्षारक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस अशा सर्वांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण थकबाकीदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करत असतानाच पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही थकबाकीची रक्कम वेळेत अदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने आपली थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पालिका आयुक्तांनी आदेश जाहीर केले असून ज्यांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा केला नसेल त्यांनी या योजनेच्या कालावधीमध्ये आपला मालमत्ता कराचा भरणा करुन कराचे देयक शुन्य (Zero Balance) असल्याबाबतची करपावती प्रत सादर करावी, असे लेखी आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे कराचा भरणा केला नसल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे. त्यामुळे अभय योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य थकबाकीदारांना आवाहन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधी आपला कर भरावा लागणार आहे. या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जाते आहे.