उल्हासनगर : उल्हासनगरातील महापालिका सदस्यांची मुदत २०२२ वर्षातच संपल्याने सध्या लोकप्रतिनिधींशिवाय पालिका आणि नागरिकांचा संवाद कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रभाग समिती स्तरावर उल्हासनगर शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आठवड्यातून एकदा जनसंवाद सभा आयोजीत करण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिकेने घेतला आहे. सुकर जीवनमान या उपक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार या सभेचे आयोजन केले जाणार आहे.

राज्य शासनाने महानगरपालिकेस १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सुकर जीवनमान या कलमांतर्गत विविध उपक्रम राबवणे आणि त्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्याचे सत्र पालिका स्तरावर सुरू आहे. याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिकेने ई कार्यालय प्रणाली राबवली होती. तर आता नागरिकांशी सुसंवाद वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये सन्माननीय नागरिकांच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांची कामे आणि तक्रारी यांचे स्थानिक स्तरावर निराकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना महानगर पालिकेच्या मुख्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर प्रत्येक सप्ताहातील एक दिवस नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी “जनसंवाद सभा” आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

सहायक आयुक्तांनी दर सोमवार दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रभाग समिती कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे, असे महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सांगितले आहे. या सभेस सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, मालमत्ता कर विभाग, नगर रचना विभाग या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेस न चुकता उपस्थित रहावे, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

जनसंवाद सभेत नेमके काय होणार

सहायक आयुक्तांनी नागरिकांना मागील आठवडयात पालिका आयुक्तांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, महाराष्ट्र शासन तसेच महानगरपालिकेच्या विविध योजना, महत्त्वाचे परिपत्रके याविषयी माहिती द्यावी, असे अपेक्षित आहेत. त्यानंतर प्रत्येक नागरिकांना दालनामध्ये बोलावून त्यांची तक्रार नोंदवून घेतील आणि शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढतील, असेही अपेक्षित आहे. तक्रार निवारणासाठी जास्त अवधीची गरज असल्यास सहायक आयुक्तसंबंधित नागरिकाला त्याची माहिती देतील आणि तक्रार विषयक नोंदणी करुन आयुक्त कार्यालयाशी संबंधित तक्रारी उप आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) यांच्याकडे पाठवतील. या तक्रारीविषयी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे दर मंगळवारी सकाळी ११ ते १२ मध्ये सर्व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत निवारण न झालेल्या तसेच जास्त अवधी लागणाऱ्या किंवा धोरणात्मक निर्णयांशी संबंधित तक्रारीविषयक बैठक आयुक्त दर सोमवारी घेतील. अतिरिक्त आयुक्त तसेच मुख्यालयातील उप आयुक्त किंवा सहायक आयुक्त हे देखील दर सोमवारी कोणत्याही एका क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेस स्वतः भेट देतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.