रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास एका जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग शेजारी असलेल्या बैठ्या घरावर कोसळल्याने घरातील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कॅम्प तीन भागात सेक्शन २२ परिसरात असलेल्या साई सदन या तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे गोपाळदास गाबरा (६३) आणि बरखा गाबरा (६०) हे दाम्पत्य जखमी झाले होते. काही तासात गोपाळदास गाबरा यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. मात्र त्याची अंमलबजावणी होण्यासाठी मोठा काळ जाणार आहे. हे होत असताना शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पडझडीचे प्रकार कायम सुरू आहेत. २५ ऑगस्ट रोजी कॅम्प दोन भागातील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजूराचा मृत्यू झाला होता. या घटनेला महिना लोटत नाही तोच उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात सेक्शन २२ भागात असलेल्या साई सदन या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा भाग रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास कोसळला. इमारतीचा हा भाग शेजारी असलेल्या एका बैठ्या घरावर कोसळला. त्यामुळे या घरात राहणारे गोपाळदास गाबरा (६३) आणि बरखा गाबरा ( ६०) हे दाम्पत्य जखमी झाल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

हेही वाचा : ठाणे स्थानकात भाजप-शिवसेनेची घोषणाबाजी

ही इमारत सुमारे २५ ते ३० वर्षे जुनी असून यात चार सदनिका होत्या, असेही माहिती शिंपी यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान गोपाळदास गाबरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही अपघातग्रस्त इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र या इमारतीतील रहिवाशांना संरचणात्मक लेखापरिक्षण करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. गोपाळदास गाबरा यांचा या इमारतीच्या पडझडीत नाहक बळी गेला आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या पत्नीला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar part of a building collapsed on a neighboring house and an old man died tmb 01