ठाणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले असले तरी त्यांच्याच ठाणे शहरात अशा कारवाईंवर अनेक मर्यादा आल्या आहेत. कारवाईच्या निमित्ताने ठाणे शहरातही अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणि कारवाईनंतर बांधकामे पुन्हा वापरात आणण्याचा उल्हासनगर पॅटर्न समोर आला आहे. खुद्द महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीच याबाबतची कबुली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी चिंचोळ्या रस्त्यांवर, गल्लीबोळात उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा नेण्यात मोठी अडचण येत. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्लॅब मध्यभागी तोडून कारवाई करण्यात येते. मात्र पुन्हा त्या ठिकाणी स्लॅब उभारले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे बांगर यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे शहरातही धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे प्रकार होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
हेही वाचा – ठाण्यात उद्या दिवसभर अवजड वाहनांना बंदी
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत मागील काही दिवसांपासून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणांवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात येत आहे. या सर्व अनधिकृत बांधकामांबाबत सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी एक मुखाने अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारींचा पाढा वाचून दाखवला होता. या सर्व लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे गांभीर्य पाहाता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभे राहिल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. तर या सर्व बांधकामावर धडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या पाडकामावेळी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असले तरी त्यातील मर्यादा समोर आल्याने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
उल्हासनगर पॅटर्न नक्की काय
उल्हासनगरात १९९० च्या दशकात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर तत्कालीन पालिकेने कारवाई करताना स्लॅब तोडले. मात्र ते स्लॅब जोडून त्यांचा वापर सुरू झाला. याच इमारती गेल्या काही वर्षात कोसळल्या आहेत. यात अनेकांना आपला जीवन गमवावा लागला आहे.
हेही वाचा – ठाण्यात तीनदिवसीय रामायण महोत्सव;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
अशी सुरू आहे कारवाई
ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी प्रभाग स्तरावरील सहाय्यक आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नवीन बांधकाम करण्यास पूर्णतः बंदी आहे. गेल्या वर्षभरात ८५२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली असून ९५ गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकामांचा पाणी आणि वीजपुरवठादेखील बंद केला आहे.