ठाणे : थायलंड देशातील महिलांना आर्थिक अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या पाच जणांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी थायलंडच्या १५ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
उल्हासनगर येथील सेक्शन १७ मधील सितारा लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये विदेशी महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ग्राहकाला पाठवून छापा घातला. याप्रकरणात पोलिसांनी लाॅजचा व्यवस्थापक पंकज सिंग (३७) याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच थायलंडच्या १५ महिलांची सुटका केली.
हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरूणाला अटक
या कारवाई दरम्यान पोलिसांनी ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त केले. सिंग आणि तेथील कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशी माहिती शेखर बागडे यांनी दिली.