उल्हासनगरः विठ्ठलवाडी परिसरात एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून पोलिसांकडे त्याच मुलीच्या पालकांविरूद्ध मारहाणीची खोटी तक्रार करण्याचा बनाव चिमुकलीनेच उघड केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी ५० वर्षीय अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपील अटक केली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होतो आहे.

गेल्या काही वर्षात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याने दिसून आले आहे. विशेष म्हणजे ओळखीच्याच व्यक्तिंकडून हे प्रकार होत असल्याने गेल्या काही घटनांमधून समोर आले आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे. विठ्ठलवाडीत परिसरात एका चार वर्षीय चिमुकलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचा केले आहेत. हा व्यक्ती ५० वर्षांचा असून पेशाने अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांना दूरध्वनी करून आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार केली. मात्र त्याच्या या तक्रारीनंतर पोलीस जेव्हा त्या मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी मुलीच्या पालकांकडे चौकशी केली असता या चिमुकलीनेच त्या नराधमाचे कृत्य पोलिसांसमोर सांगितले. संतापजनक म्हणजे व्यक्तीने ज्या मुलीवर अत्याचार केले, त्याच मुलीला आपण दत्तक घेणार आहोत असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चिमुकलीला तु या व्यक्तीला कशी ओळखते अशी विचारणा केल्यानंतर चिमुकलीने अत्याचाराची हकिकत पोलिसांसमोर सांगितली.

चिमुकलीच्या वक्तव्यानंतर त्या व्यक्तीचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला तात्काळ अटक केली आहे. तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पडवळ यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातो आहे. मात्र या प्रकारानंतर उल्हासनगरातून संताप व्यक्त होतो आहे. त्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.