उल्हासनगरच्या कॅम्प चार येथील एनसीटी शाळेच्या जवळ असलेल्या विजेच्या रोहित्राच्या ( ट्रान्सफॉर्मर ) संपर्कात आल्याने एका २५ वर्षीय तरूणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाजवळच्याच परिसरात हा तरूण राहत होता. तो या रोहित्राच्या संरक्षण जाळीच्या आत कसा गेला याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र या तरूणाने रोहित्राला बसवलेली एक कळ काढण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला विजेचा धक्का लागला असावा अशी शक्यता महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बेकायदा आश्रमशाळेत चार मुलींचे लैंगिक शोषण

उल्हासनगरातील कॅम्प चार परिसरात एनसीटी शाळेजवळ असलेल्या रस्त्यालगत रोहित्र आहे. येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक १४ च्या परिसरात राहणाऱ्या सागर बोदडे या २५ वर्षीय तरूणाला रोहित्रचा विजेचा जोरदार धक्का लागला. या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सागरच्या कुटूंबियांनी आणि पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सागर बोदडे याचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी रोहित्रातील एक कळ काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महावितरणचे विभागीय अभियंता अशोक नरवडे यांनी दिली आहे. एक कळ काढण्यात आल्यानंतर दुसरी काढत असताना हा विजेचा धक्का या तरूणाला लागला असावा असा अंदाजही नरवडे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी विद्युत निरिक्षकांना अहवाल देण्यात आला असून त्यावर पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नरवडे यांनी दिली. या रोहित्राला संरक्षण लोखंडी जाळी होती. ती उघङून हा तरूण रोहित्राजवळ गेला असावा, असाही अंदाज स्थानिक महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.