कल्याण : कल्याणमधील उंबर्डे येथील हळदी समारंभाच्या कार्यक्रमात शरद लोखंडे हातामधील स्टीलचे पिस्तुल सुमीत भोईर यांना दाखवित असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. पोलिसांनी शरद लोखंडे यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का ,याची खातरजमा पोलीस ठाण्यातील अभिलेखात केली. त्यावेळी शरद लोखंडे यांच्या नावे शस्त्र परवाना नसल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी उंबर्डे गावात दत्त मंदिरासमोरील मैदानात दीप्ती लोखंडे यांच्या विवाहनिमित्त हळदी समारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान नाचत असताना चिंतामण नामदेव लोखंडे यांनी व्यासपीठावर येऊन कंबरेला खोचलेले रिव्हाॅल्व्हर हाताने बाहेर काढले. ते डाव्यात हातात घेत हात उंचावून मै हू डाॅन या गाण्यावर नाचू लागले. यावेळी चिंतामण लोखंडे यांच्या बाजुला लहान बालके, महिला, इतर व्हराडी मंडळी नाचत होती. नजर चुकीने काही दुर्घटना याठिकाणी घडली असती तर त्याची जबाबदारी कोणाची होती, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत होते.

नागरिकांचे जीवित धोक्यात येईल, सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करून स्वसंरक्षणासाठीच्या परवानग्याचे जाहीर प्रदर्शन करून शस्त्र वापर परवान्याचा नियमभंग केला म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार अविनाश पांडुरंग यांनी मनाई आदेशाचा भंग केला म्हणून चिंतामण लोखंडे यांच्या विरुध्द शस्त्र अधिनियम कायद्याने शनिवारी गुन्हा दाखल केला.

यावेळी हळदी समारंभात नाचत असताना शरद नामदेव लोखंडे जवळील एक स्टीलचे पिस्तुल हळदी समारंभातील सुमित भोईर याना दाखवित असल्याचे दृश्यध्वनीचित्रफितीमध्ये पोलिसांना दिसत आहे. या चित्रफितीची पोलिसांनी पडताळणी केली. शरद लोखंडे यांच्याकडे गृह विभागाच शस्त्र परवाना आहे का याची खात्री केली. त्यावेळी शरद लोखंडे यांच्याकडे परवाना नसताना एक पिस्तुल विनापरवाना वापरत असल्याचे पोलिसांचे निदर्शनास आले. म्हणून पोलिसांनी त्यांच्या विरुध्द शस्त्र कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

ही हळदी समारंभाची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यावर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या चित्रफितीची गंभीर दखल घेऊन खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांना शस्त्राचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्वसंरक्षणासाठीच्या शस्त्राचा अशाप्रकारे नियमबाह्य वापर होत असल्याने उपायुक्तांनी खंत व्यक्त केली होती. हा गु्न्हा दाखल करताना पोलिसांनी दाखल गुन्ह्यात शस्त्र जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.

Story img Loader