शवविच्छेदन अहवालातून कारण स्पष्ट; मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर जीव गमावला
ठाण्यातील वसंत विहार परिसरात वास्तव्य करणारे उमेश सराफ यांचा १५ दिवसांपूर्वी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. नागरी वस्तीमधील मधमाश्यांच्या पोळ्यांमुळे एवढी गंभीर घटना घडू शकते हे लक्षात आल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या वसाहतींमधून वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण पसरले.
सराफ यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणांकडून सुरू होता. दरम्यान, सराफ यांचा मृत्यू मधमाश्यांच्या हल्ल्याने नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट होत असून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मधमाश्या अचानक आक्रमक कशा झाल्या यासंबंधीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वसंत विहार येथील रौनक प्लाझा इमारतीखाली मित्राची वाट पाहत उभे असलेल्या उमेश सराफ यांचा १५ एप्रिल रोजी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला होता. मधमाश्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सूज होती. त्यामुळे त्यांचे मृत्यूचे नेमके कारण काय, याविषयी संभ्रम होता. मात्र सराफ यांचा मृत्यू मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मधमाश्यांना डिवचल्याशिवाय त्या कोणावर हल्ला करीत नाहीत. जर हल्ला झाला तर असेल त्या ठिकाणी पालथे झोपावे. दोन्ही हातांनी चेहरा झाकावा. कोणतीही हालचाल करू नये. अनेक वेळा इमारतीखाली मधमाश्यांची पोळी असतात. सायंकाळच्या वेळी मधमाश्या प्रकाशाकडे आकर्षिल्या जातात. त्यामुळे घरातील खिडक्या बंद कराव्यात किंवा खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
– अमित गोडसे, मधुमक्षिका मित्र, पुणे.
अपघात कसा झाला?
सार्वजनिक रजा असल्याने बँकॉक येथील लिनेरी या फार्मा कंपनीत गेल्या चार वर्षांपासून वितरण विभागात काम करणारे उमेश सराफ आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात परतले होते. १५ एप्रिलला त्यांचे बँकॉकला रात्री ११.३० चे परतीचे विमान होते. त्यामुळे बँकॉकला परतण्यापूर्वी ठाण्यातील हिरानंदानी मिडोज येथे राहणारे मित्र संदीप जोशी यांना सकाळी ८.३० वाजता त्यांनी भेटायला बोलावले. मात्र इमारतीखाली येताच त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी ते सैरावैरा पळू लागले. त्यांच्या संपूर्ण अंगावर मधमाश्या बसल्या होत्या. इतक्यात ते इमारतीजवळ असलेल्या दुकानासमोर आले. दुकानात असलेल्या महिलेने त्यांच्यावर थंड पाणी टाकले. त्यामुळे त्यांच्या अंगावरील माशा उडाल्या, मात्र ते खाली कोसळले. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.