बदलापूरच्या पूर्व भागात संध्याकाळी दररोज पाच तास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी उकाडय़ाने हैराण होत आहेत. काही दिवसांपासून सकाळी चार ते ते रात्री नऊ या वेळेत बदलापुरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. नियमित भारनियमन नाही, असे वीज मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी या मुद्दय़ावरून बदलापूर पूर्वेतील राजकारण तापू लागले आहे.
मंगळवारी दुपारी या भागातील वीज गायब झाली. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. त्यात पुन्हा सायंकाळीही वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. नोकरीवरून घरी परत येणाऱ्या चाकरमान्यांनादेखील अंधारात चाचपडत घरी पोहोचावे लागले. संपूर्ण बदलापूर पूर्वेची वीज गायब झाल्याने येथील सारेच नागरिक त्रस्त झाले होते. तसेच निवडणुकीचा काळ असल्याने निवडणुकीतील उमेदवारांचे प्रचाराचे काम ठप्प झाले होते.
याबाबत महावितरणचे बदलापूर पूर्व भागाचे अतिरिक्त अभियंता ईश्वरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचण कुठे निर्माण झाली हे सापडत नव्हते. दुरुस्ती पथकाला उशिरा शिरगांव परिसरातील औदुंबर आपार्टमेंट जवळ जमिनीखाली असलेली विद्युत तार खराब झाल्याने हा प्रवाह खंडीत झाल्याचे निष्पन्न झाले. ती तार बदलण्याचे सध्या काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला घेराव
बदलापूरजवळील आंबेशिव या ग्रुप ग्रामपंचायतीतील गावांना विजेच्या अपुऱ्या दाबामुळे मोटरमधून पाणी पुरवठा होणे बंद झाले होते. तीन महिन्यापासून त्यांना हा त्रास होत होता. याबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे या गावातील नागरिकांनी व विशेषत: महिलांनी बदलापूर पश्चिमचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी. आर. बोके यांच्या कार्यालयात त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावर अभियंता बोके यांनी या गावांना योग्य दाबाने मिळत असून जागेवर माणूस पाठवून माहिती घेऊ. तसेच कामात कुचराई करणाऱ्या लाइनमन शरद पवार यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.