तहसीलदारांकडे तक्रार करूनही कारवाई नाही
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांचा पेच वाढत चालला आहे. या जमिनीवर भूमाफियांनी शेकडो बेकायदा इमारती बांधल्या आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्यासंबंधी अहवाल तलाठय़ांनी पालघर तहसीलदारांना देण्यात आला आहे, मात्र अद्याप त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर, भय्यापाडा, संजयनगर या भागांत सरकारी जागेवर भूमाफियांनी हजारो अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या नातेवाईकांनीही सरकारी जागेवर चाळींचे आणि इमारतीचे बांधकाम केल्याचे उघड झाले असतानाही त्यावर आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. संजयनगर येथे दोन मजले इमारतीचे बांधकाम सरकारी जागेवर केलेले असल्याने अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश द्यावे, असे निवेदन सरावली तलाठय़ांनर तहसीलदारांना दोन वर्षांपूवी दिले होते. मात्र मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही त्यावर कारवाई न झाली नाही.
कारवाईकडे दुर्लक्ष
महसूल विभागाकडून तालुक्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते, परंतु सरावली येथील सरकारी जागेवर एकाही इमारतीवर कारवाई केली गेली नाही. गेल्या १० वर्षांत सरावली ग्रामपंचायत हद्दीत अवधनगर येथे एकदाच तत्कालीन तहसीलदारांनी कारवाई करत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली होती, परंतु त्यानंतर एकही कारवाई झाली नाही.
अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायत अधिनियमानुसार घरपट्टी आकारली होती. शासकीय नियमानुसार ज्या विभागाची जागा आहे, त्या विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे अपेक्षित आहे. – सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी, सरावली
सरावली येथील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – महेश सागर, तहसीलदार पालघर