६४० दुकाने आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

मुंब्य्रातील रस्ते अडविणाऱ्या दुकानांवर मंगळवारी महापालिकेने बुलडोझर फिरवला. या कारवाईत गुलाब मार्केटसह मुंब्रा ते वाय जंक्शनपर्यंतच्या रस्त्यावरील ६४० दुकाने आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले. गाळ्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता कारवाईमुळे पुन्हा रुंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. घोडबंदरमधील वाघबीळ आणि वागळे इस्टेट परिसरातील शेकडो बाधीत बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईनंतर आता महापालिका प्रशासनाने मुंब्य्राकडे मोर्चा वळवला आहे. पालिकेने दीड-दोन वर्षांपूर्वी मुंब्रा स्थानक ते वाय जंक्शनपर्यंतच्या रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे तोडली होती. त्यानंतर रस्ता रुंद झाल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यालगत पुन्हा बेकायदा गाळे आणि बांधकामे उभी राहिली असून या बांधकामांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी पुन्हा या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

गुलाब मार्केटसह मुंब्रा ते वाय जंक्शनपर्यंतच्या रस्त्यावरील ६४० स्टॉल जमीनदोस्त करण्यात आले. तसेच एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरातील ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, साहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, मारुती गायकवाड, सचिन बोरसे, झुंझार परदेशी, विजयकुमार जाधव, महेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईसाठी सात पथके तयार करण्यात आली होती. आठ जेसीबी, १० डम्पर आणि २०० कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

Story img Loader