उल्हासनगरः उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात असलेल्या कचराभूमी जवळच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. त्या बांधकामांवर उल्हासनगरच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने कारवाई केली आहे. यावेळी १७ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरात विविध ठिकाणी असलेल्या लहान मोठ्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई केली जाते आहे. गेल्याच आठवड्यात उल्हासनगर महापालिकेच्या शाळांबाहेर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर सोमवारी उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात हनुमान नगर, दुर्गानगर कचरा भूमीजवळ असलेल्या मोकळ्या जागांवर अनधिकृत बांधकामे उभी केली जात असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सोमवारी पोलीस बंदोबस्तात कॅम्प दोन भागातल्या या कचराभूमीजवळच्या भुखंडांवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. यात या ठिकाणी १० खोल्यांच्या जोत्याचे बांधकाम, ५ पक्के खोल्यांचे बांधकाम आणि २ झोपड्यांचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. मात्र ही बांधकामे उभी राहत असेपर्यंत स्थानिक पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करत होते, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. अशी अनेक लहान मोठी बांधकामे शहरात उभी होत असताना स्थानिक अधिकारी त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे बांधकामे उभारणाऱ्यांचे फावते, असाही आरोप होतो आहे.