कल्याण: भिवंडी जवळील पिंपळगावात एका रहिवाशाने ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बांधकाम परवानग्या न घेता रस्त्यामध्ये बांधकाम सुरू केले आहे. यामुळे अनेक वर्षाचा गावातील रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पिंपळगावचे रहिवासी आणि जमीन मालक सुदीप भोईर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, कोनगाव पोलीस ठाणे, एमएमआरडीए यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्याला बाधा आणणारे हे बांधकाम तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश स्थानिक महसूल प्रशासनाला दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात बांधकामधारक प्रवीण भोईर हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकांचा दबाव आणून कारवाई रोखून धरली असल्याची चर्चा पिंपळगावात आहे. राजकीय दबाव आल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असुनही स्थानिक प्रशासन यंत्रणा हे बांधकाम तोडण्याचे किंवा रोखण्याची कार्यवाही करत नसल्याचे तक्रारदार सुदीप भोईर यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून पिंपळगावात सुरू असलेल्या या बांधकामाची भिवंडी तालुक्यात चर्चा सुरू आहे. एका लोकप्रतिनिधीच्या स्वीया साहाय्यकाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे हा तिढा कायम आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा बांधकाम चुकीचे असुनही राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास पुढे येत नसल्याचे भोईर यांनी सांगितले.

हेही वाचा: ठाणे: नागरिकांच्या तक्रारींचा झटपट निपटारा करण्यासाठी सुरू होणार मुख्यमंत्री क्षेत्रीय कार्यालय

पिंपळगाव ग्रामपंचायत, नियोजन प्राधिकरण एमएमआरडीएने प्रवीण भोईर या बांधकामधारकाला तातडीने बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार कार्यालयाने प्रवीण भोईर यांना गोणखनिज उत्खनन प्रकरणी नोटीस बजावली आहे. रस्त्यामधील बेकायदा बांधकाम तुटलेच पाहिजे या विषयी सर्व ग्रामस्थ ठाम आहेत.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, या प्रकरणात वाढता राजकीय हस्तक्षेप झाला आहे. कारवाई केली तर काय शिक्षा होईल याचा आम्ही विचार करू शकत नाही. बांधकामावर कारवाई नाही केली तर आम्हालाच तोंडघशी पडावे लागते. या दुहेरी कोंडीत आम्ही अडकलो आहोत.

हेही वाचा: मुलीबरोबर का बोलता म्हणून तरुणांची वडिलांना मारहाण; डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरा बाहेरील प्रकार

हा दोन भावांमधील सामायिक जमिनीचा वाद आहे. तो त्यांनी सामोपचाराने मिटवणे आवश्यक आहे. हा वाद सध्या गवगवा असलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकाच्या दबावामुळे निर्माण झाला आहे. पोलीस, महसूल, एमएमआरडीए अधिकारी या प्रकरणात उघडपणे काही बोलू शकत नाहीत. कल्याण, डोंबिवलीत हस्तक्षेप करणारा हा स्वीय साहाय्यक केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याही हद्दीत घुसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाहीतर आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे तक्रारदार सुदीप भोईर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तहसलीदार अधिक पाटील यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized construction in road at pimpalgaon near bhiwandi political pressure hinders the authorities taking action tmb 01