|| भगवान मंडलिक
२७ गावांतील बेकायदा बांधकामांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचे पालिकेने ‘ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. २७ गावांमधून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आठ गावांच्या हद्दीत २०० हून अधिक इमारती बेकायदा असल्याचे आढळून आले आहे. काही इमारतींमध्ये कुटुंबे राहण्यास आली आहेत. ६० ते ७० नव्या बेकायदा इमारती रिकाम्या आहेत. या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यास अतिक्रमण नियंत्रण विभागाने सुरुवात केली आहे.
बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवलीतील मुख्य समस्या आहे. वाहन कोंडी, पाणीटंचाई, वाहनतळ असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यापूर्वीच्या अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांनी या बेकायदा बांधकामांकडे नेहमीच डोळेझाक केली. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत (निलंबित) यांच्या कार्यकाळात प्रभाग अधिकारी, भूमाफिया यांच्या संगनमताने बेकायदा बांधकामे उभी राहिली असल्याचे आयुक्त गोविंद बोडके, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुनील जोशी यांच्या निदर्शनास आले. बोडके यांनी अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांसह २७ गावातील बेकायदा इमारती, चाळींची पाहणी केली. आडिवली—ढोकळी गावात सरकारी ४० एकर जमिनीवर माफियांनी समूह पद्धतीने ५० हून अधिक बेकायदा इमारती उभारल्याचे दिसले. अशीच परिस्थिती भाल, वसार, दावडी, गोळवली, चिंचपाडा, सोनारपाडा, आशेळे—माणेरे, मानपाडा, नांदिवली पंचानंद, तर्फ, मानपाडा, पिसवली, भोपर भागात असल्याचे निदर्शनास आले. पालिका, ‘एमएमआरडीए’च्या परवानग्या न घेता उभारलेली बेकायदा बांधकामे पाहून आयुक्त आश्चर्यचकित झाले.
२७ गावांच्या हद्दीत समूह पद्धतीने उभारण्यात आलेल्या, निर्माणाधीन, रिकाम्या असेलल्या बेकायदा इमारती तातडीने तोडण्याचे आदेश आयुक्त बोडके यांनी उपायुक्त जोशी यांना दिले. जोशी यांनी ही बांधकामे तोडण्यासाठी संबंधित भूमाफियांची नावे, त्यांना नोटिसा बजावणे आणि पोलीस बंदोबस्त घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे अतिक्रमण नियंत्रण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. अनेक बेकायदा इमारतींमध्ये रहिवासी राहण्यास आले आहेत. बांधकाम परवानग्या नाहीत. चटई क्षेत्राचे उल्लंघन करून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. ही बांधकामे नियमितीकरणासाठी काही माफिया प्रयत्नशील आहेत. त्यांना पालिकेत थारा दिला जात नाही. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न असलेल्या काटई, घारिवली, संदप, निळजे गावातील ‘ग्रोथ सेंटर’च्या जमिनीवर बेकायदा बांधकामे झाल्याची तक्रार माहिती कार्यकर्त्यांने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत, असे सऊत्राने सांगितले. ग्रोथ सेंटर भागातील बांधकामांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. भोपर, कोपर, आयरे, देवीचापाडा, नवापाडा, कुंभारखाण पाडा, मोठागाव, टिटवाळा, कोळसेवाडी, खडेगोळवली, मोहने, आंबिवली, मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण केले जाईल.
जबाबदारी निश्चित
अतिक्रमण नियंत्रणचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी किती आदेश दिले. त्यांच्या कार्यकाळात किती बांधकामे तोडण्यात आली. ज्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या काळात बांधकामे उभी राहिली, त्यांनी किती बांधकामे तोडली, अशा अधिकाऱ्यांची माहिती संकलित करून त्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.