लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या शाळांच्या आवारात काही अनधिकृत बांधकामे असल्याची बाब शाळांच्या पाहणीवेळी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी या बांधकामांना हटवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर अखेर पालिकेच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने कारवाई करत दोन शाळांबाहेरील बांधकामे हटवली आहेत.

उल्हासनगर महापालिका शाळांच्या दर्जाबाबत सातत्याने टीका केली जाते. शिक्षण मंडळाच्या कारभारावरही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी रूजू झालेल्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी गेल्या आठवड्यात पालिकेच्या शाळांना अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचवेळी काही वर्गांमध्ये आयुक्तांनी विद्यार्थ्यांची वाचनाची परिक्षाही घेतली. काही विद्यार्थी या वाचन चाचणीत नापास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्त आव्हाळे यांनी संबंधित वर्गाच्या शिक्षिकेला नोटीस बजावली. त्याचवेळी शाळेच्या दर्जाबाबतही काम करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.

शाळेच्या परिसरात काही अनधिकृत बांधकामे असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. उल्हासनगर कॅम्प तीन भागातील शाळा क्रमांक ८ शेजारी अनधिकृत दुकान, तर शाळा क्रमांक १७ च्या प्रवेशद्वारालगतच्या अनधिकृत घराचे बांधकाम असल्याचे त्यांना दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाला यावर कारवाई आदेश दिले होते. त्यानुसार या विभागाचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी या बांधकामांवर कारवाई केली.

Story img Loader