सकाळी सकाळी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य माणसाला घरासमोर, चौकात, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या होर्डिग्जवरील चेहरा पहावा लागतो. अगदी मनात इच्छा नसेल तरीही जबरदस्तीने हे होर्डिग्ज पाहात पाहातच जगावे लागते. कुणाला कोणीतरी वाढदिवस म्हणून शुभेच्छा देत असते तर कोणाला कोणाच्या तरी मृत्यूचे अत्यंत दु:ख झालेले असते. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाने या नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या सुख-दु:खात जबदरस्तीने सहभागी व्हायचे. असेच चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळते.
मुंबई उच्च न्यायालयाने होर्डिग्ज लावण्यास मनाई केली आहे. तरीही ठाणे, कळवा परिसरात प्रत्येक चौकाचौकांत, रस्त्यारस्त्यांच्या बाजूचे, लाइटचे खांब यावर होर्डिग्जची तोरणं लागली आहेत. सामान्य माणूस मात्र हतबल होऊन ही होर्डिग्ज पाहतो आहे. या होर्डिग्जवर लावण्यात आलेले फोटो त्याला दिलेल्या विनोदी कॅप्शन यामुळे मनोरंजन होते हे खरे असले तरी सामान्य माणसाला न आवडणाऱ्या वक्तीचा चेहर बघत बघतच कामावर जावे लागते. सहन करावे लागते.
न्यायालयाने आदेश दिले म्हणून काय झाले, पण होर्डिग्ज लावणाऱ्यांचा उत्साह कोण रोखणार? अर्थात, महापालिकेला कारवाईचे आदेश आहेत, पण महापालिकेला ही होर्डिग्ज दिसतच नाहीत. महापालिकेच्या यंत्रणेला हे शहर अत्यंत सुंदर आणि स्वच्छच दिसते. राजकीय होर्डिग्ज तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न दिसण्याचा आजार गेली अनेक वर्षे आहे. मग त्यावर न्यायालय आणि समान्य माणूस काहीही करू शकत नाही. ही सगळी होर्डिग्ज पालिकेच्या दृष्टीने अदृश्य आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने दृश्य आहेत. ठाण्यात एकीकडे जुन्या इमारती कोसळत आहेत. रोज माणसं मरत आहेत. ठाण्यातून कामाला जाणारा चाकरमानी लोकलच्या गर्दीत चिरडून निघतो आहे. ट्राफिक जाममध्ये ठाणे शहर गुदमरू लागले आहे. असे एक नाही अनेक प्रश्न आहेत. समान्य माणूस अशा अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे याच माणसाला सकाळी सकाळी उठल्यावर काय पहावे लागते तर कुठल्या तरी नेत्याचे होर्डिग्जवर लावलेले हसरे चेहरे. हे पुढाऱ्यांचे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे चेहरे सामान्य माणसाकडे बघून हसणारे.. हे का आपल्याकडे बघून हसत आहेत, या प्रश्नाचे उत्तर मात्र या सामान्य करदात्याला
पडतो. हे चेहरे सामान्य माणसाच्या सामान्य प्रश्नांवर तर हसत नाहीत ना.. हे चेहरे तुमचे आयुष्यात काहीच होऊ शकत नाही असे मनातल्या मनात म्हणत तर हसत नाहीत ना.. न्यायालयाने बंदी आणली तरी बघा लावली की नाही आम्ही होर्डिग्ज असे मनातल्या मनात पुटपुटून हसत तर नाहीत ना.. किंवा कारवाईची जबाबदारी असणारे अधिकारीही आमचे काहीही करू शकत नाहीत असे म्हणत हे असत नाहीत ना.. असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात. याची उत्तरे मिळत नाहीत. काही वर्षांपूर्वी बदलापूर येथे अशाच होर्डिग्जला कंटाळलेल्या नागरिकांनी आपल्या घरातल्या कुत्र्याचे होर्डिग्ज लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपरोधिक प्रयत्न केला. त्यानंतरही होर्डिग्ज लावणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा