|| ऋषीकेश मुळे

मुंब्य्रात फळांच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून विक्री, वाहतूककोंडीला आमंत्रण

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर गेल्या काही दिवसांपासून भररस्त्यात अवैध गुटखा विक्री सुरू आहे. अल्पवयीन मुले फळविक्री करीत असल्याचे भासवून गुटखा विकताना दिसत आहेत. अवजड वाहनांचे चालक बाह्य़वळण रस्त्यावर येताच वेग कमी करून दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या विक्रेत्यांकडून गुटखा घेतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे.

राज्य सरकारने कोटय़वधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन आणि विक्रीवर काही वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे, तरीही राज्याच्या विविध भागांत आजही मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची विक्री होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत जप्त केल्या जाणाऱ्या हजारो टन गुटख्यामुळे यापूर्वीही हे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर बंदरातून भिवंडी, नाशिक, गुजरात या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुंब्रा बाह्य़वळण रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अवैध गुटखा विक्रीचे केंद्र बनला आहे. बाटली बंद पाणी आणि फळे विकण्याच्या नावाखाली या मार्गावर दररोज गुटख्याची हजारो पाकिटे विकली जात आहेत. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून रोज ३० ते ४० हजार जड अवजड वाहने प्रवास करतात. त्यातील बहुतेक वाहनांचे चालक इथे आल्यावर वेग कमी करतात. दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात पैसे देऊन गुटखा खरेदी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि अनेकदा वाहतूक कोंडी होते. वाहनाचा वेग अचानक कमी केल्याने अपघात होत असल्याचेही सांगितले जाते.

या विक्रेत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. काही व्यक्ती अल्प मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांना भर उन्हात उभे करून गुटखा विक्री करवून घेतात. मुंब्रा आणि परिसरात त्यांची एक मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निजामपुरा आणि घोडबंदर परिसरात काही दिवसांपूर्वी लाखो रुपयांच्या गुटख्याचा अवैध साठा सापडला होता. आता मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर खुलेआम गुटखा विक्री सुरू असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुटखा विक्री होत असल्यास कारवाई होणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे गुटखा विक्रीवर कारवाई करण्यात येते. मुंब्रा पोलिसांकडून पाहणी करण्यात येईल.   – किशोर पासलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे</strong>

अल्पवयीन मुलांकडून गुटखा विक्री होत असल्यास हे भयावह आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.    – आर सी रुनवाल, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

Story img Loader