अंबरनाथ: मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची खळबळजनक घटना अंबरनाथजवळ घडली आहे. या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडले आहे. काटई अंबरनाथ राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना समोर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाका येथून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात मार्गिकेवर उलट्या दिशेने ट्रेलर चालवत हा चालक निघाला. मार्गात समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला त्याने धडक देत ट्रेलर पुढे नेला. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकेच नव्हे, तर पोलिसांच्याही गाडीला त्याने धडक दिली. तर मार्गातीलच एका दुचाकीस्वाराला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केले.

शिवाजीनगर पोलीस आणि आसपासचे काही रिक्षाचालक हे पाठलाग करत असल्याने मद्यधुंद ट्रेलर चालकाने आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर नेला. मात्र, यावेळी ट्रेलरचा वेग जास्त असल्याने तो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला. तात्काळ पोलिसांनी या ट्रेलर चालकावर शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. दरम्यान, वाहनांना दिलेल्या या धडकांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही वाहनचालक व पादचारी जखमी झाले आहेत. तसेच या विचित्र प्रकारात किमान ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. वाहतूक पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncontrolled trailer truck damaged many cars in ambernath driver arrested asj