ठाणे शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने या त्रासात भर पडली आहे. मंगळवारी दुपारी साडेअकरा ते दीड असा सुमारे दोन तास ठाणे शहरातील गोखले मार्ग, नौपाडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. वीजवाहिन्यांतील तांत्रिक दोषामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत असले तरी वाढत्या वीजमागणीला आवर घालण्यासाठी अघोषित भारनियमन तर सुरू झालेले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. अर्थात महावितरणच्या भांडुप परिमंडळाने याचा इन्कार केला आहे.
वाढत्या उकाडय़ामुळे पंखे, कुलर आणि एसी यांची प्रचंड गरज भासू लागल्याने त्याचा भार वीजपुरवठा यंत्रणेवर पडत असून वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. ठाण्यातील व्यावसायिक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोखले रस्त्याला याचा फटका बसला. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी, गोखले रोड, राममारुती रोड, गावदेवीपर्यंत हा वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन दुपारी तब्बल दोन तास वीजपुरवठा खंडित झाला; पण व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. उन्हाळ्याच्या काळात अशा वीजपुरवठा खंडित  होत असल्याने हे अघोषित भारनियमन असल्याचा आरोप होत आहे.

Story img Loader