ठाणे : येथील वागळे इस्टेट परिरातील काही भागांना पाणी पुरवठा करणारी भुमिगत जलवाहिनी गुरूवारी पहाटे चार वाजता ज्ञानेश्वरनगर नाका परिसरात फुटली. यामुळे जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले असून त्याचबरोबर वागळे इस्टेट परिसरातील काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवार दुपारपर्यंत वाहिन्या दुरुस्तीचे काम पुर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिकेकडून वर्तविली जात असली तरी दुरुस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याण ते दादर प्रथम श्रेणी महिला डब्यातून फेरीवाल्यांचा प्रवास

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ५२ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा वागळे इस्टेट येथील काही भागांमध्ये करण्यात येतो. नितीन कंपनी जंक्शन येथून इंदिरानगर जलकुंभापर्यंत रस्त्यालगतच आठ फुट खोल भुमिगत जलवाहिनी टाकण्यात आली असून त्याद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येतो. ही जलवाहिनी ३० ते ३५ वर्षे जुनी आहे. हि जलवाहिनी गुरुवारी पहाटे चार वाजण्याचा सुमारास ज्ञानेश्वरनगर नाका येथे फुटली. त्यामुळे त्या परिसरातील रस्त्यावर पाणी वाहू लागले. रस्त्यावर पाणी कुठून येते, याची नागरिकांनी पाहाणी केली. त्यावेळी जलवाहीनी फुटल्याची बाब समोर आली. याबाबत नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेऊन या वाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद केला. तोपर्यंत या वाहीनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पालिकेने तातडीने जलवाहीनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असून हे काम शुक्रवार सकाळपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविली आहे. सकाळपर्यंत दुरुस्ती काम पुर्ण झाल्यानंतर दुपारनंतर परिसराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. परंतु दुरुस्ती कामामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे वागळे इस्टेटच्या काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे खाडी किनारी मार्गावर दोन ठिकाणी जंक्शन; बाळकुम आणि खारेगाव परिसर मार्गाला जोडणार

या भागांत पाणी नाही

जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी इंदिरानगर जलकुंभामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या जलकुंभातून परिसरातील इतर जलकुंभात पाणी पुरवठा करण्यात येतो आणि त्यानंतर या जलकुंभामधून विविध परिसरात पाणी पुरवठा होता. तेथील भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामध्ये इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपा देवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर,  भटवाडी या भागांचा समावेश आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underground water pipe burst in thane water supply disturbed in some parts of wagle estate zws
Show comments