ठाणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम असल्याच्या चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे समर्थकांनी आता हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याच संदर्भात टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक पार पडली असून त्याचबरोबर नवी मुंबईतील ऐरोली आणि मीरा-भाईंदर शहरातही अशाच बैठका घेण्याचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी आखले आहे. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हेही वाचा >>> दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

 युतीच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेच्या वाटयाला जात होती. शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणे बदलली असली तरी ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. असे असतानाच, भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला आहे. तसेच ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या मतदारसंघात भाजपच्या ‘चाणक्यांनी’ केलेल्या सर्वेक्षणात संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर असल्याचे दावे यानिमित्ताने केले जात आहेत. या चर्चेमुळे ठाणे, नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली असून स्वपक्षाच्या नेत्यांनाच संधी द्यावी अशी भूमिका यापैकी काहींनी शिंदे पिता-पुत्रांकडे मांडल्याचे समजते. त्यातच ठाणे, कल्याण, पालघर या मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा राहिलेल्या भागातील मतदारसंघाचे चित्र अजूनही स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. या संदर्भात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा >>> तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

आज ऐरोलीत बैठक ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकीय घडामोडीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमातून शिंदे समर्थकांनी बैठकांना सुरुवात केली असून येथे शनिवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेचीच असून आताही महायुतीच्या जागावाटपात ती शिवसेनेलाच मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. अशाच प्रकारची बैठक सोमवारी नवी मुंबईतील ऐरोली भागात आयोजित करण्यात आली असून त्यानंतर मीरा-भाईंदर शहरातही अशीच एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Story img Loader