कल्याण – कल्याण शहरात गेल्या आठवड्यापासून विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर लावलेले फलक फाडण्याची जोरदार चढाओढ लागली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुक उमेदवार साईनाथ तारे, मोहने येथील संध्या साठे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त लावलेले फलक अज्ञात इसमांनी फाडून राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>> घामाच्या धारांमुळे वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढली; प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्यासाठी कल्याण-डोंबिवली स्थानकात जवानांची दमछाक

या फलक फाडण्यावरून स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञातांंविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेत एका कार्यक्रमाचे फलक लावले होते. ते फलक अज्ञाताने फाडून टाकले. पवार विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण पश्चिमेत महायुतीमधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. पवार यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कल्याण पश्चिमेतील इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दुर्गाडी चौक येथे गुरुवारी दसरा मेळाव्याचे फलक लावले होते. हे फलक अज्ञात इसमांनी फाडून टाकले. ठाकरे गटातील शाखाप्रमुख जयवंत टापरे यांना हा प्रकार समजताच त्यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते सावध, एप्रिल महिन्यात आव्हाड यांनाही आली होती बिष्णोई टोळीची धमकी

मोहने भागात लहुजीनगर भागात राहणाऱ्या पक्षीय कार्यकर्त्या संध्या साठे यांनी मोहने भागात नवरात्री सणानिमित्त भाविकांना शुभेच्छा देणारे दोन फलक लावले होते. हे फलक लहुजीनगरमध्ये राहणारे अभिषेक प्रकाश पवार (२४), मोन्या फुलोरे (२३) आणि तिपन्नानगरमध्ये राहणारे सुंदर मुरगन (२५) यांनी फाडल्याची तक्रार संध्या साठे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. अशाप्रकारे फलक फाडून आरोपींनी समाजात सामाजिक, राजकीय तेढ निर्माण होईल अशी कृती केली आहे. अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार साठे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. या तिन्ही प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकार वाढण्याची शक्यता राजकीय कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.