कल्पेश भोईर

नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा पालिकेकडून एकाच ठिकाणी

नागरिकांकडून ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याचे आवाहन करणारी महापालिका मात्र सर्व कचरा एकत्र करून कचराभूमीत टाकत असल्याचे उघड झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. जर पालिका कचराभूमीत ओला आणि सुका कचरा एकत्र टाकत तर मग नागरिकांनी तो वेगवेगळा का जमा करायचा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

वसई विरार शहरात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी पालिका परिक्षेत्रात ठिकठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचराकुंडय़ा ठेवण्यात आला होत्या. ओल्या कचरा टाकण्यासाठी पालिकेने हिरव्या कचराकुंडय़ा दिल्या आहेत तर सुका कचरा टाकण्यासाठी निळ्या रंगाच्या कचरा कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओला कचरा कोणता सुका कचरा कोणता हे न पाहताच सर्व एकत्रित करून कचऱ्याच्या गाडीमध्ये भरला जात आहे. हा कचरा कचराभूमीत नेल्यानंतर तेथेही एकत्रच टाकला जात आहे. दिवसाला शहरात ६५० ते ७०० टनापेक्षा अधिक कचरा जमा करून १२०हून अधिक कचऱ्याच्या गाडय़ामधून भोयदापाडा येथील कचरा भूमीत टाकला जात आहे.

केंद्र सरकारने जेव्हापासून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेतल्यानंतर सर्वत्र कचरा वर्गीकरणाची सुरुवात झाली होती त्यानुसार वसई विरार महापालिकेने देखील ओला व सुका कचरा वेगळा करण्यात यावा यासाठी कचराकुंडय़ांचे वाटप करण्यात आले आहे व कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करून नागरिकांना आवाहन केले होते. पंरतु जमा होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकाच उदासीन असल्याने ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण होणार कसे, असा प्रश्न उपस्थित होऊ  लागला आहे.  वसई विरार शहरातील संपूर्ण भागातील कचरा एकत्रित येत असल्याने त्याचे वर्गीकरणदेखील करता येत नाही. दररोज मोठय़ा प्रमाणात कचरा येत असतो आणि या कचऱ्याचे व्यवस्थापन करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घनकचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करून वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पासाठीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.

– माधव जवादे, पालिका शहर अभियंता

Story img Loader