लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: एकात्मता ही समरसतेतून येते. म्हणूनच समरसता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा ठरतो. तसेच समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘महिलांना समान न्याय मिळण्यासाठी’ हा कायदा प्रभावी ठरेल. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्मात-पंथात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, कोणत्याही धर्मावर संकट न येता सर्वांचे धर्माधिकार अबाधितच राहणार आहेत. असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ‘समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा?’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील टीप – टॉप प्लाझा येथे हा व्याख्यान कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा-ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘महिलांना समान न्याय मिळण्यासाठी’ समान नागरी कायदा महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी ठरणार आहे. तिहेरी तलाक संबंधित कायदा लागू होतानाही विविध प्रकारचे हितसंबंध असणाऱ्या स्वार्थी घटकांनी असाच विरोध आणि बुद्धिभेद केला होता. मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाच्याही धार्मिक अधिकारांवर गदा आली नाही, उलट तलाकचे प्रमाण सुमारे ९५ टक्क्यांनी कमी होऊन असंख्य महिलांचे आणि परिवारांचे जीवनमान सुधारले. असे स्पष्ट मत राज्यपाल खान यांनी व्यक्त केले. तर, या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्मात-पंथात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, कोणत्याही धर्मावर संकट न येता सर्वांचे धर्माधिकार अबाधितच राहणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक विविधता ही आम्हा भारतीयांची समस्या नसून ‘आम्ही विविधतेचा उत्सव साजरा करतो’. विविधतेचा मूळ स्रोत एकच आहे आणि त्या एका सत्याकडे जाण्याचे विविध मार्ग असू शकतात, अशा एकात्म विचारावर श्रद्धा असणारे आम्ही भारतीय आहोत. हजारो वर्षांपासून अनेक धर्म-पंथांना भारतीय भूमीवर सामावून घेणारे, सर्वसमावेशकतेची संस्कृती मानणारे आम्ही भारतीय आहोत. समान न्यायाचे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणे हाच समान नागरी संहितेचा मूळ उद्देश असून, तोच त्याचा परिणामही असणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी खान यावेळी अनेक प्राचीन धार्मिक संदर्भ, वेद-उपनिषदे-कुराण यांतील संदर्भ आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील उदाहरणे अशा सखोल माहिती आपल्या वाख्यानातून उपस्थितांना दिली.

आणखी वाचा-कल्याणमध्ये महिलेवर १५ जणांचा सशस्त्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी

या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आणि म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आरिफ खान यांचे अष्टपैलूत्व अधोरेखित केले. समान नागरी कायद्यावर अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या मोजक्या लोकांपैकी आरिफ खान एक महत्वाचे व्यक्ते असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे कोषाध्यक्ष श्री अरविंद रेगे, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य सुजय पतकी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uniform civil code will not interfere with religion sects says kerala governor arif mohammad khan mrj
Show comments