ठाणे : ज्या इंग्रजांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले. त्या इंग्रजांना रामभक्तांमुळे मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या पाच वर्षांत ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यावेळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान असतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या प्रागंणात ३८ वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला मंगळवारपासून सुरू झाली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. यावेळी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ श्रीराम पूजा ते राष्ट्र पूजा ’ या विषयावर व्याखान दिले.
आणखी वाचा-दिवसाढवळ्या लोकशाही ची हत्या झाली; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महाविकास आघाडीची बॅनरबाजी
२०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. परंतु ज्या इंग्रजांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले. त्या इंग्रजांना रामभक्तांमुळे मागे टाकून आता भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान असतील असे ठाकूर म्हणाले.
भारत हा सनातनी देश आहे. मुघल आणि इंग्रजांना सनातनी धर्म नष्ट करता आला नाही. त्यामुळे भविष्यातही सनातन धर्म चिरंतर राहील. करोनाकाळात अर्थव्यवस्था कोसळेल, कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडतील, असे सांगितले जात होते. मात्र रामभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे करोनाकाळात लस बनली, त्यांनी देशात २२० कोटी लस मोफत देऊन १५७ देशांना लस उपलब्ध करून दिली. ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले आणि पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्याची हमी दिली आहे. हीच खरी राष्ट्रपूजा आहे, असेही ते म्हणाले.