डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री डोंबिवली जिमखाना येथे येऊनही क्रीडा, खेळांचे व्यासपीठ असलेल्या डोंबिवली जिमखाना व्यवस्थापनाकडून रविवारी रात्री केंद्रीय मंत्री ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत नाहीच, पण त्यांच्या सहकाऱ्यांना वाढीव निवासासाठी खोली देण्यास जिमखाना व्यवस्थापनाने टाळाटाळ केल्याने भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकारी, नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवली जिमखाना येथे रात्री सव्वा बारा वाजता हा प्रकार घडला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना रात्रीच्या निवासासाठी डोंबिवली जिमखाना येथील एक खोली नोंदणीकृत करुन ठेवली होती.
दिवसभराचा कार्यक्रम आटोपून मंत्री ठाकूर जिमखानाकडे जाण्यास निघण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षक, स्वीय साहाय्यकांनी वाढीव खोलीची मागणी जिमखाना प्रशासनाकडे केली. ती एका जिमखाना सदस्याच्या प्रयत्नाने मिळवून देण्यात आली. हिमाचल प्रदेश येथून मंत्री ठाकूर यांना भेटण्यासाठी काही पदाधिकारी आले होते. रात्रीची वेळ असल्याने त्यांच्याही निवासस्थानाची सोय करणे आवश्यक असल्याने भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी जिमखाना प्रशासनाकडे अतिरिक्त तिसरी खोली नोंदणीकृत करुन पाहुण्यांची तेथे सोय करण्याची मागणी केली. रात्री सव्वा बारा हा वाजता प्रकार सुरू होता. यावेळी जिमखान्याच्या व्यवस्थापकाने ‘अशाप्रकारे वाढीव खोल देणे शक्य नाही. तुम्हाला कोणाशी बोलायचे त्यांच्याशी बोला. तुम्हाला खोली देणे शक्य होणार नाही,’ अशी उत्तरे भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : ठाणे : जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव ; जिल्ह्यातील दोन बैल आणि चार गाईंना लागण
एक केंद्रीय मंत्री जिमखान्यात निवासासाठी येत आहे. त्यांचे स्वागत, निवास व्यवस्था करुन देणे हे व्यवस्थापकाचे काम असुनही त्याने उलट उत्तरे दिल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. डोंबिवलीतील एक नामवंत क्रीडा संस्था म्हणून डोंबिवली जिमखान्याकडून त्यांचे स्वागत नाहीच, पण खोली देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाच्या अडेल भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. भाजप पदाधिकाऱ्यांनी जिमखानाच्या काही सदस्यांना ही माहिती दिली. त्यानंतर हालचाल होऊन वाढीव खोली व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिली, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?
या संदर्भात जिमखान्यातील एक सदस्याने सांगितले, डोंबिवली जीमखान्याची कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन त्यात पदाधिकारी निवडीची प्रक्रिया होईल. सध्या प्रभारी कार्यकारी समिती काम पाहत आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. असा प्रकार यापुढे घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आपणास हा प्रकार माहिती असता तर हा विषय वाढला नसता. घडला प्रकार चुकीचाच आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
जिमखान्याचे सचिव महेंद्र मोकाशी यांनी सांगितले, आपण डोंबिवली बाहेर असतो. त्यामुळे हा प्रकार आपणास समजला नाही. असे घडणे योग्य नाही. आपण या प्रकाराची सविस्तर माहिती घेत आहेत. डोंबिवली जिमखान्याचे विकास, क्रीडा विषयक विषय प्रलंबित आहेत. जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मांडले असते तरी ते विषय पुढे सरकले असते, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.