डोंबिवली- कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या विभागातील भाजपची लोकसभेचीसाठीची मांड भक्कम व्हावी म्हणून सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा क्षेत्रात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असले तरी समन्वयाने कल्याण लोकसभेची जागा भाजप बळकावणार अशीच चिन्हे या बैठक आणि भाजप नेत्याच्या या विभागातील दुसऱ्या दौऱ्यामुळे दिसत आहेत.
हेही वाचा >>> पोलादाच्या मळीपासून टिकाऊ टणक रस्ते; ज्येष्ठ रस्ते बांधणी तज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांची माहिती
लोकसभेसाठी राज्यातील ४५ जागा आणि विधानसभेसाठी शिंदे-फडणवीस सरकारने २०० जागांचे लक्ष निश्चित केले आहे. हा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ताकदीने राज्याच्या विविध भागात विकास कामांच्या घोषणा, ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकाचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन भाजपने विकास कामांच्या नावाने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बैठकीला विशेष महत्व असल्याचे राजकीय विश्लेषकाने सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे : सार्वजनिक उद्यानात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
डोंबिवली एमआयडीसीतील रोटरी सभागृहात केंद्रीय मंत्री ठाकूर मंगळवारी दिवसभर तळ ठोकून बैठका, भेटीगाठी घेणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा विभागासाठी आ. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर सुगदरे, समीर कारेकर, कल्याण पूर्व विधानसभा विभागासाठी आ. गणपत गायकवाड, डाॅ. चंद्रशेखर तांबडे, संजय मोरे, डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मंदार टावरे, संजीव बिरवाडकर, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी राहुल दामले, नंदू परब, अंबरनाथ विधानसभा क्षेत्रासाठी गुलाबराव करंजुले, नाना सूर्यवंशी, अभिजित करंजुले, उल्हासनगर क्षेत्रासाठी राजेश वधारिया बैठकीत सहभागी होणार आहेत. याशिवाय सहकार भारती, माध्यम केंद्र बैठक, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा, संघ कार्यकर्त्यांशी संवाद असे दिवसभराचे नियोजन मंत्री ठाकूर यांचे आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत हा बैठकांचा सपाटा सुरू राहणार आहे.