भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेत निवडून येण्यासाठी भाजपनं केंद्रीय नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आज डोंबिवली दौऱ्यावर आहेत. ठाकूर यांच्या स्वागतासाठी डोंबिवलीत भाजपाकडून चौकाचौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

हेही वाचा- पलावा पूल, एमआयडीसीतील रस्ते लवकर पूर्ण करण्याची सुबुध्दी यंत्रणांना दे ; मनसे आ. प्रमोद पाटील यांचे गणरायाला साकडे

अनुराग ठाकूर डोंबिवली दौऱ्यावर

अगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ठाकूर कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ दौऱ्यावर आहेत. आज ठाकूर डोंबिवलीत दाखल होणार आहेत. यावेळी ते भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघातील प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत. या बैठकांना २ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन भाजपाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील नांदिवली नवनीत नगरला नागरी समस्यांचा विळखा ; वेळेवर बस नाही, रिक्षा चालकांची मनमानी

शहरभर फलकबाजी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या स्वागतानिमित्त डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, दिवा भागात भाजप पदाधिकाऱी, कार्यकर्त्यांनी फलक लावले आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात प्रत्येक भाजप कार्यकर्ता, पदाधिकारी यांना कार्यक्रम देऊन व्यस्त ठेवण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला एकावेळी दोन हजाराहून अधिक सदस्य उपस्थित राहतील असे नियोजन भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या आगमना निमित्त भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघात शक्ति प्रदर्शनाची जोरदार तयारी केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांचा दिवसभराचा कार्यक्रम

सकाळी आ. संजय केळकर यांच्या उपस्थितीत भाजप लोकसभा कोअर समितीची बैठक डोंबिवली एमआयडीसीतील शामियाना सभागृहात होणार आहे. सकाळी ११.३० वाजता भाजप जिल्हा व मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत ब्राम्हण सभा येथे होणार आहे. दुपारी १ वाजता भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ब्राम्हण सभा येथे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव गुलाबराव पाटील, डोंबिवली पदाधिकारी मिहिर देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी ३ वाजता ठाकूर सभागृह येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींशी संवाद साधणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक विकी तरे, मोरेश्वर भोईर, मुकुंद पेडणेकर मंदार हळबे उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा- डोंबिवली : भारत तोडण्याचे काम करणाऱ्यांकडून भारत जोडोचा नारा ; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेवर टीका

संध्याकाळी ५ वाजता जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत सारस्वत काॅलनी मधील कानविंदे सभागृहात बैठक होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर फडके रस्त्यावरील गणेश मंदिरात गणपतीचे दर्शन घेतील. तेथे मंदिर संस्थान अध्यक्ष राहुल दामले, मंदार हळबे, संदीप पुराणिक त्यांचे स्वागत करणार आहेत.

संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात मंत्री अनुराग ठाकूर दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने पक्षनेतृत्वाला अहवाल सादर करणार आहेत.

Story img Loader