डोंबिवली-  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आ. रवींद्र चव्हाण यांचा तीन दिवस डोंबिवली, कल्याण परिसरात दौरा असल्याने या मंत्र्यांना गाठून कोणा नागरिकाने आपली तक्रार करायला नको पालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागातील फेरीवाले गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. शनिवारी संध्याकाळीच फेरीवाल्यांच्या नेत्यांना पथक प्रमुखांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रस्ते, पदपथ अडवून बसू नका असा संदेश पोहचविल्याने, त्याचे ‘प्रामाणिकपणे’ पालन करुन फेरीवाल्यांनी साहाय्यक आयुक्तांना ‘अभय’ दिले.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा <<< केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे स्वागत नाहीच, पण खोली देण्यास टाळाटाळ ; डोंबिवली जिमखाना व्यवस्थापनावर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी

कोणी कितीही कणखर बाण्याचा आयुक्त कल्याण डोंबिवली पालिकेत आला तरी सुरुवातीचे काही दिवस डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले गायब होतात. आयुक्त रुळून १५ दिवस उलटले की पुन्हा फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करण्यास सुरुवात करतात. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दोन महिन्यापूर्वी पदभार स्वीकारताच डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले काही दिवस गायब झाले होते. आता पुन्हा फेरीवाले पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. ग, फ प्रभागांचे साहाय्यक आयुक्त, त्यांचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख यांनी नियमित फेरीवाल्यांवर कारवाई करावी म्हणून डोंबिवली विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आला आहे. या उपायुक्तांच्या आदेशाला आणि त्यांनाही फेरीवाले, साहाय्यक आयुक्त घाबरत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा <<< रिक्षा प्रवासी भाडे दरात चार रुपयांनी वाढ करा; ठाणे ऑटो रिक्षा मेन्स युनियनची राज्य शासनाकडे मागणी

रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर डोंबिवलीत येणार आहेत. ते भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या निमित्ताने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात भाजप कार्यालयात येणार आहेत. शहराच्या विविध भागात ते फिरणार आहेत. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळताच शनिवारी रात्रीच फेरीवाला हटाव पथकातील प्रमुखांनी फेरीवाल्यांना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात तीन दिवस न बसण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे रविवारी सकाळ पासून फेरीवाले रेल्वे स्थानक भागातून गायब झाले होते. सकाळ पासून गजबजणारे रस्ते अचानक फेरीवाला मुक्त आणि मोकळे कसे झाले हा विचार करत पादचारी या रस्त्यांवरुन येजा करत होते.

हेही वाचा <<< स्टेट बँकेतून बोलतो सांगून कल्याण मध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; ‘केवायसी’च्या नावाने दोन लाख २५ हजार उकळले

फेरीवाले रस्त्यावर नसल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते प्रशस्त, पदपथ मोकळे दिसत होते. त्यामुळे पादचारी, व्यापारी समाधान व्यक्त करत होते. पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाले दाद देत नसल्याने फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आठवड्यात एक ते दोन वेळा केंद्रीय मंत्र्यांनी डोंबिवलीत यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी भागातील फेरीवाले हटविण्यात साहाय्यक आयुक्तांना यश आले. डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद आणि त्याचे बाजार शुल्क वसुलीचे कंत्राट असल्याने हा पदाधिकारी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक भागात बसविण्यास भाग पाडतो, अशी चर्चा आहे. या पदाधिकाऱ्याचा एक कामगार कार्यकर्ता फ प्रभागात फेरीवाला हटाव पथकात असल्याने या संगनमतामुळे डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटत नसल्याचे समजते.

Story img Loader