सागर नरेकर, लोकसत्ता
बदलापूर: गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र शुक्रवारी बदलापुरात किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या १९ वर्ष पूर्णत्वाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अचानक हजेरी लावत अनेकांना धक्का दिला. यावेळी कपिल पाटील यांनी आमदार कथोरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पाटील आणि कथोरे यांच्यात मनोमिलन झाल्याचे बोलले जाते आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील हे दोघेही नेते भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी कपिल पाटील यांच्या गळ्यात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री पदाची माळ पडली. मात्र एकाच पक्षाचे नेते असूनही गेल्या काही महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये मोठे शीतयुद्ध रंगले होते. अप्रत्यक्षपणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नव्हती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांच्या इतर मतदारसंघात निधी देण्याचा कृतीवर आक्षेप घेतल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून वरिष्ठांकडे आपली बाजूही मांडण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. या दोघांच्या शीतयुद्धामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी सबुरीने घेऊन मनोमिलन करावे अशी आशा व्यक्त होत होती.
आणखी वाचा-“…म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला”, जितेंद्र आव्हाड यांचे विधान
शुक्रवारी आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ४२ वर्षे आणि आमदारकी कारकिर्दीला १९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी त्यांचा गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखत कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आगमनाची घोषणा झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलाखत सुरू होण्यापूर्वी मंत्री कपिल पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचून त्यांनी आमदार किसन कथोरे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर काही काळ पाटील यांनी किसन कथोरे यांची मुलाखत ऐकली. या प्रसंगामुळे गेल्या महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे बोलले जाते आहे. तर या दोघांच्या मनोमिलनानंतर संकटात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.