ठाणे : अनेक लोकांना सायकल चालविण्याचा छंद आहे. जर्मनीमध्ये सर्व रस्त्यांवर वेगळी मार्गिका आहे. पण आपल्या देशात अशी वेगळी मार्गिका केली तर, पदपथावर लोक येऊन अतिक्रमण करतात, अशी टिप्पणी करत काही शहरातील रस्त्यांचे सायकल मार्गिकेत रुपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केली. आपला देश ऊर्जेला आयात करणारा नाही तर, ऊर्जेला निर्यात करणारा देश आपल्याला बघायचा आहे, असेही ते म्हणाले.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील टी एम ए हॉल येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी लॅब इंडिया कंपनीच्या ई बायसिकलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक आणि लॅब इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बापट हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ई-सायकलच्या महत्वाविषयी माहिती दिली. आपल्या देशात २२ लाख कोटी रुपयांचे जीवश्म इंधन (फाॅसिल फ्युअल) आपण आयात करतो. त्यामुळे केवळ आयाताच आपल्यावर भार नाही आहे तर, देशामध्ये प्रदुषणाच्या रुपाने मोठी समस्या आहे. त्यामुळे आयात, पर्यायी, किफायतशीर प्रदूषणमुक्त भारत असे धोरण वाहतूक मंत्री म्हणून आम्ही स्विकारले आहे, असेही गडकरी म्हणाले.

विद्युत वाहने ही देशात लोकप्रिय झाली आहेत. हे उद्योग क्षेत्र आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळेच २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले, त्यावेळी माझ्या खात्यातर्फे आम्ही एक उद्दीष्ट ठेवले. ऑटोमोबाईल उद्योगाची आकारमानता १४ लाख कोटी रुपये इतकी होती. पण, तीन महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकले आणि आता आपला तिसरा क्रमांकावर आलो आहोत. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. ७९ लाख कोटी रुपयांची त्यांची आकारमानता आहे. चायनाची ४७ लाख करोड तर, भारताची २२ लाख कोटी आहे. पण २०३० मध्ये जगात विद्युत बसगाड्या, कार, दुचाकी आणि ट्रक बनविण्यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर असेल, असा दावाही त्यांनी केला.

विद्युत वाहनांची निर्मीती जेव्हा सुरू झाली, तेव्हा लिथियम आयन बॅटरीची किंमत १५० डॉलर पर किलोवट पर तास होती. आता ती १०० डॉलर पर्यंत आली आहे आणि ती अजून खाली जाईल. त्यावेळी पेट्रोल, डिझेल इंधनावरील कार, दुचाकी आणि विद्युत वाहने याची किंमत एकसारखी होईल, असेही ते म्हणाले.

युरोप मधील अनेक देशांमध्ये सायकल हे वाहतूकीचे मुख्य वाहन आहे आणि त्याठिकाणी लिथियम आयन बॅटरीच्या आधारावर सायकल तयार झाली. तसे आता आपल्याकडे बॅटरी केमिस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च सुरू आहे. आपल्या धोरणांमुळे सेमीकंडक्टरचे मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू झाले आहेत. लिथियम आयन, सोडियम आयन, झिंक आयन, ॲल्युमिनियम आयन ही पण केमिस्ट्री विकसित होते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विद्युत वाहनांचे महत्व वाढले. यामध्ये आपल्याकडे बजाज, टिव्हीएस, हिरो, होंडा या दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांचे ५० उत्पादन निर्यात होत आहे. त्यामुळे आपल्या देशातील बाजारपेठेत जेवढी किंमत आहे, त्यापेक्षा जास्त किंमत आपल्याला बाहेर मिळणार आहे. आपल्याकडे मोठ्याप्रमाणात ई सायकलची निर्मिती होत आहे. त्यामुळे आपला देश ई-सायकल मोठ्याप्रमाणात निर्यात करेल. कारण, अर्थव्यवस्था नैतिकता, पर्यावरणविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे, असेही ते म्हणाले.