लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला तीन ते चार जणांनी क्लिनिकमध्ये शिरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या डॉक्टरचे मुंब्रा येथे क्लिनिक आहे. दररोज ते क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी येत असतात. शनिवारी ते क्लिनिकमध्ये आले होते. रुग्णांवर उपचार करून ते रात्री नमाज पठन करून निघाले. परंतु त्यांच्या क्लिनिकच्या बाहेरील भागात दोन महिला बसल्या होत्या. त्यामुळे त्यांना तपासून निघून जाण्याचे त्यांनी ठरविले. डॉक्टरने त्यांना तपासणी कक्षात बोलावले असता, त्यातील एक महिला संतापून मुलीवर योग्य उपचार केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करू लागली.
आणखी वाचा-पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
त्याचवेळी बाहेरून आणखी तीन ते चार मुले त्याठिकाणी आले. त्यांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मारहाण करणारे तेथून निघून गेले. या मारहाणीत त्यांना रक्तस्त्राव झाला. तसेच त्यांच्या हाताला अस्थिभंग झाला. ते उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.