लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आपली खाजगी वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. या वाहनांमध्ये मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची भर पडल्याने कल्याण शिळफाटा रस्त्यावर रविवारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.
या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पत्रीपूल ते शिळफाटा कल्याण नाका दरम्यान वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक तैनात आहेत. वाहतूक सेवकांना पुढे करून वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहतुकीचे नियोजन करत आहेत. वाहतूक सेवकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आणि चौकात चारही बाजूने येणारी वाहतूक नियंत्रित करणे आणि ही वाहने नियोजन करून सोडणे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणा बाहेर जात असल्याने शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीत अडकत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. वाहतूक सेवकांना वाहतूक नियोजनाचे पहिले प्रशिक्षण देण्यात यावे आणि नंतरच त्यांना वाहतूक नियोजनासाठी शिळफाटा रस्त्यावर उभे करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
आणखी वाचा-शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन
गेल्या काही महिन्यांपासून शिळफाटा रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. या रस्त्यावर चौका चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. बहुतांशी वाहतूक सेवक वाहतुकीचे नियोजन करण्यापेक्षा दुचाकी, मालवाहू वाहने, चारचाकी वाहने अडवून त्यांची कागदपत्रे तपासण्यातच वेळ घालवत आहेत. या कालावधीत त्या रस्त्यावर आणि चौकात वाहतूक कोंडी होते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
कोळसेवाडी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले, नवीन वर्षामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बाहेर आले आहेत. मॉलमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ही वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तत्पर असतात. वाहतूक सेवकही वाहतूक नियोजनाची जबाबदारी चोखपणे पार पडत आहेत.