लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर: उल्हासनगर शहरात गुरुवारी उघडकीस आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मामाने मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मामाने मुलीचा मृतदेह जाळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागातील प्रेमनगर टेकडी परिसरात एक तीन वर्षांची चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुरुवारी या चिमुकलीचा मृतदेह कचऱ्यात आढळून आला. आरोपी आणि त्याचा रिक्षाचालक मित्रही पोलिसांसोबत मृतदेह शोधण्यात मदत करत होते. आरोपीच्या मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली.

आणखी वाचा-ठाणे : स्ट्राँग रुम भोवती त्रिस्तरीय सुरक्षेचे कडे, केंद्रीय शसस्त्र दलासह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर मामाने आपला गुन्हा कबूल केला. मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केले नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचे डोके ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला. यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unravelling death case of little girl in ulhasnagar mrj