लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाणे शहरात मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे चालण्यासाठी, कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. उद्या गुढीपाडवा असल्याने सोमवार रात्रीपासूनच स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांची तयारी सुरू होती. गावदेवी मैदानात येथे १० हजार चौ. फूटांची रांगोळी काढली जात होती. पावसामुळे रांगोळी कलाकारांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. अवघ्या दोन तासांत आठ मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

g20 rangoli thane
(फोटो सौजन्य- दिपक जोशी)

राज्यातील विविध भागात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे सकाळी ६:३० वाजेपासूनच वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. सकाळी शहरात अनेकजण कामानिमित्ताने आणि चालण्यासाठी बाहेर पडले होते. या अचानक पडलेल्या पावसामुळे त्यांचे हाल झाले. अनेका ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. गुढीपाडवा निमित्ताने ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याची तयारी सोमवारपासून सुरू होती. गावदेवी मैदानात संस्कार भारती कोकण प्रांत संस्थेकडून जी-२० हा विषय घेऊन १० हजार चौ. फूट इतकी भव्य रांगोळी काढली जात होती. मध्यरात्री रांगोळी कलाकार मेहनत घेऊन ही रांगोळी रेखाटत होते. ही रांगोळी अंतिम अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे ती पुसली गेली. सकाळी ८:३० नंतर पाऊस थांबला. परंतु या कालावधीत ८.१ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली.

Story img Loader