लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
शुक्रवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. नेहमीप्रमाणे ढगाळ वातावरण विरून जाईल असे नागरिकांना वाटत होते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अचानक डोळखांब भागात पाऊस सुरू झाला. या भागात हरभरा पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. या पेरणीमध्ये पाऊस पडला तर शेतात टाकलेला हरभरा कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भात झोडणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठीचा पेंढा अद्याप शेतावरील खळ्यावर ठेवला आहे. या पेंढ्याचा उपयोग गाई, बैल, म्हशींसाठी पुढील पाच महिने करतो. पेंढा भिजला तर तो खराब होतो.
आणखी वाचा-अखिलेश शुक्ला यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, कल्याणमधील मराठी कुटुंबीयांना मारहाण प्रकरण
काही शेतकऱ्यांनी भात भरडण्यासाठी भात भरडाई गिरणीसमोर रांगा लावल्या आहेत. असे भात भरडाईसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या भाताला पावसाचा फटका बसला. भात खरेदी केंद्राबाहेरील भातांच्या राशींनाही पावसाचा फटका बसला. या राशींवर प्लास्टिक टाकून ठेवण्यात आले असले तरी जमिनीवरील पाणी या राशींखाली जाऊन भात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रस्त्यावरून जाणारे दुचाकी स्वार, पादचारी पावसात भिजत प्रवास करत होते. मजूर कष्टकरी डोक्यावर सागाची पाने घेऊन पावसात भिजत घर गाठत होते.
थंडीचे दिवस आणि त्यात हा पाऊस गारठ्याचा असल्याने नागरिक आडोसा धरून उभे होते. या पावसामुळे दिवाळीनंतर वाल, मुग पेरलेल्या पिकांना चांगला लाभ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी भेंडीसह इतर भाजीपाला लागवड सुरू केली आहे. त्यांना या पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
आणखी वाचा-उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात, अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही
मुंबई, ठाणे परिसरातून डोळखांब भागातील शेतघर, आपल्या दुसऱ्या घराच्या ठिकाणी वर्षाअखेरनिमित्त मौजमजेसाठी आलेल्या शहरी नागरिकांनी मात्र या अवकाळी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. ज्येष्ठ, महिला, लहान मुले पावसाचा आनंद लुटत असल्याचे चित्र होते.